Beed accident: धारूर घाटात अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाच्या दुरुस्तीच्या आश्वासनाला विलंब

पिकअप दरीत कोसळून पेटला; टँकरही घाटात पलटी, वाहनचालक किरकोळ जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
Beed accident
Beed accident
Published on
Updated on

अतुल शिनगारे

धारूर : शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. घाटाच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे चित्र आहे.

घाटातील अरुंद रस्ता, धोकादायक वळणे, रस्त्यावरील उंच-सखल भाग आणि अपुऱ्या सुरक्षिततेमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. १५ ऑगस्टच्या पहाटे आणि सकाळी या घाटात दोन वेगवेगळे अपघात झाले. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Beed accident
Beed Crime News: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भावाच्या डोक्यात घातला दगड ; राजाभाऊ यांचा जागीच मृत्यू

धारूर शहरातून माजलगावकडे जाणाऱ्या मार्गावर १५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास महिंद्रा पिकअप वाहन घाटातील अरुंद रस्ता आणि वळणावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला. हे वाहन थेट दरीत कोसळले. अपघातानंतर वाहनाला आग लागली. या घटनेत चालक किरकोळ जखमी झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Beed accident
Beed Crime News: केज तालुक्यात शेतात काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

दरम्यान, त्याच दिवशी सकाळी सुमारे सात ते आठ वाजण्याच्या सुमारास धारूरमार्गे माजलगावकडे जाणारा टँकर घाटातील अरुंद रस्ता, उंच-सखल भाग आणि धोकादायक वळणामुळे चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून टँकरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस जाऊन खबरदारी घेण्याचे काम सतत करत आहे. आजही केले आहे पण या घाटातील रस्त्यामुळे पोलीस प्रशासनावरही ताण वाढीव असल्याचे बोलले जात आहे.

Beed accident
Beed Crime News : तीन वाळूमाफियांना पोलिसांचा दणका; हर्सुलला रवानगी

अनेकांचे बळी; तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

धारूर घाट हा गेल्या अनेक वर्षांपासून अपघातप्रवण मार्ग म्हणून ओळखला जात आहे. या घाटात यापूर्वी अनेक भीषण अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. अपघातांमुळे वाहनांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घाटाच्या धोकादायक परिस्थितीबाबत स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विविध संघटनांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Beed accident
Beed Accident News : लिंबागणेशचा महामार्ग रक्तरंजित

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही विलंब

घाटातील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन घाटाची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत दुरुस्तीची कामे करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, निर्धारित कालावधी उलटूनही प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू झालेले दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Beed accident
Beed Accident | नागापूर-टोकवाडी रस्त्यावर भीषण अपघात; तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

आणखी किती बळी गेल्यानंतर उपाययोजना होणार?

खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक या मार्गावरून होते. मात्र, घाटातील धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार अपघात होत असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

“आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आणि धारूर घाटाचे काम होणार?” असा संतप्त सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. घाटाची तातडीने पाहणी करून तात्पुरती दुरुस्ती, संरक्षक कठडे, धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाय तसेच कायमस्वरूपी रस्ता सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news