

बीड : बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या दोन अपघातांनी बीड जिल्हा हादरला. धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या ट्रकला दौलावडगावजवळ रुग्णवाहिकेने मागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा मृत्यू झाला. दुसरा अपघात गुरुवारी झाला. त्यात बीड येथील सागर ट्रॅव्हल्सची बस उलटून सहा जणांचा मृत्यू झाला.
भोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक धामणगावकडून अहमदनगर दिशेने जात होता. वळण घेत असताना ट्रकला मागून आलेल्या रुग्णवाहिकेने धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे (वय 35, धामणगाव ता. आष्टी), मनोज पांगू तिरपुडे, पप्पु पांगू तिरखंडे, (दोघे रा. जाट देवळा, ता. पाथर्डी) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, (35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.