

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव शहरात भर रस्त्यावर भाजप सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर आगे यांचा मंगळवारी (दि.१५) निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी नारायण शंकर फपाळ यास अटक केली होती. त्याला आज (दि.१६) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Babasaheb Age Murder Case)
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे रस्त्यावर भाजप कार्यालया समोर बाबासाहेब उभे होते. यावेळी तेथे आरोपी नारायण याने बाबासाहेब यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. आपल्या पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून नारायणने हा खून केला होता. या घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे करत आहेत. दरम्यान बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्याकडून या प्रकरणाच्या तपासाबाबत अधिक माहिती घेतली.