

आष्टी : आष्टी तालुक्यात गत काही काळापासून वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. ३ ऑगस्ट रोजी वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आले होते, त्यानंतर २० ऑगस्ट रोजी ब्रह्मगाव शिवारात वाघाने एका गायीची शिकार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या कॅमेरामध्ये वाघ दिसून आला आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले होते. हा वाघ गेल्या काही दिवसांपासून या भागात ये-जा करत होता. ३ ऑगस्ट रोजी त्याच्या पावलाचे ठसे देखील समोर आले होते. यानंतर हा वाघ कोणालाही दिसला नव्हता. परंतु दि.२० ऑगस्ट रोजी ब्रह्मगाव शिवारामध्ये या वाघाचा वावर असल्याचा ठोस पुरावा समोर आला आहे.
यामध्ये एका गायीची शिकार या वाघाने केली आहे. वाघाचा या भागात वावर असल्याने वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातील एका कॅमेरामध्ये हा वाघ दिसून आला आहे. हा वाघ गेल्या काही महिन्यांपासून या भागात ये-जा करतो, परंतु कोणत्याही शेतकऱ्यास उपद्रव झालेला नाही, त्यामुळे विनाकारण घाबरण्याची कोणतीही गरज नाही. एखादा वन्यप्राणी दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले आहे.
पाच जिल्ह्यांत वाघाचा वावर
आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांत दिसणारा वाघ हा, पाच जिल्ह्यांत भ्रमंती करतो. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव व सोलापूर या पाच जिल्ह्यांत या वाघाचे क्षेत्र असून तो काही महिन्यांच्या अंतराने आष्टीत ये-जा करतो, आठ महिन्यांपूर्वी हा वाघ येऊन गेला होता, त्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये दाखल झाला आहे. वाघाने केलेली शिकार ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या सिमेवर केलेली असल्याने तो जामखेड परिसरात निघून गेल्याचा अंदाज देखील वनविभागाने व्यक्त केला असून शेतकऱ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, काही संशयास्पद हालचाल दिसल्यास वनविभागाला कळवावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केले आहे.