

Beed news
आष्टी : कर्जबाजारीपणा, सावकारांकडून पैशासाठी होणारा सततचा तगादा आणि कमी वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या आर्थिक विवंचनेतून आष्टी आगारातील एसटी चालकाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
अन्सार हबीब शेख (वय ४६, रा. साबलखेड) हे आष्टी एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. रात्रीच्या सुमारास आष्टी बसस्थानकातील विश्रांती कक्षात त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने एसटी महामंडळातील कर्मचारी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख हे आर्थिक अडचणींमध्ये होते. कर्जाच्या पैशांसाठी सावकारांकडून वारंवार होणारी मागणी व तगादा, तसेच कमी वेतनात कुटुंबाचा खर्च भागविण्याची धडपड यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. बीड ते नवगण राजुरी या मार्गावर हा अपघात घडला. कैलास टूले, अक्षय शिंदे, ऋषिकेश फुलझळके अशी अपघातामध्ये ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवरून आपल्या गावी परत जात होते.
बीड ते नवगण राजुरी मार्गावरील उकंडा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिली. अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांचे मृतदेह रुग्णालयात दाखल केले.