

आष्टी : भर पावसाळा सुरू असतानाही आष्टी शहरावर दुष्काळाच्या झळा कायम आहेत. जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरासह परिसरातील जलस्रोत कोरडेच आहेत. परिणामी आष्टी नगरपंचायतीला नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून, ही परिस्थिती दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करणारी ठरत आहे.
सामान्यतः जुलै अखेरीस तलाव, विहिरी आणि बंधारे पाण्याने भरलेले असतात. मात्र यंदा केवळ रिमझिम पावसामुळे जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पिकांच्या वाढीवर अनिश्चिततेचे सावट असून शेतकरी आणि नागरिक दोघेही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
आष्टी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाळदंत मोरे यांनी सांगितले की, प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेच्या १५ टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. मेहेकरी पाणीपुरवठा प्रकल्पातून पाणी आणून विविध भागात वितरित केले जात असून, पुढील काही दिवसांतही पावसाने दडी मारली तर शहराची गरज लक्षात घेऊन टँकरची संख्या वाढविण्याची वेळ येऊ शकते.
शहरातील अनेक भागांमध्ये नियमित नळपाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचा टँकरवरच मोठ्या प्रमाणात आधार आहे. वाढती लोकसंख्या, वाढलेला पाण्याचा वापर आणि अपुरा साठा यामुळे अनेकांना खासगी टँकर किंवा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे.
पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, केवळ टँकरपुरवठ्यावर अवलंबून न राहता जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि कायमस्वरूपी जलनियोजनाची मागणी जोर धरू लागली आहे.
मोठ्या पावसाची प्रतीक्षा
आष्टीकर यांच्या नजरा अजूनही आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शहरासह ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भर पावसाळ्यातही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने यंदाचा हंगाम आष्टीसाठी दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र करणारा ठरत आहे.