

Beed Cattle Smuggling Illegal Sand Transport
कडा : अवैध वाळू वाहतूक आणि गोवंशाची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध आष्टी पोलिसांनी धडक कारवाई केली. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी १४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३० सप्टेंबर रोजी टाकळसिंग ते हिंगणी रोडवरील नदीच्या पुलाजवळ विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची माहिती प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांना मिळाली. त्यानुसार सकाळी ७.४५ वाजता पोलिसांनी छापा टाकून महिंद्रा अल्ट्रा वन अर्जुन ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनातील सुमारे एक ब्रास वाळूची किंमत १० हजार रुपये आहे. या प्रकरणी कानीफनाथ पांडुरंग झांबरे (रा. टाकळसिंग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, खडकत परिसरात पेट्रोलिंग करताना सीना नदीपात्रात बोलेरो पिकअपमध्ये गोवंशीय वासरे कोंबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून अवघ्या १५ ते २० दिवसांच्या ३० वासरांची सुटका केली. त्यांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असून सात लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली. वासरांना गोशाळेत दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सद्दाम ऊर्फ अजीज पठाण कुरेशी, जलील हारुण कुरेशी आणि मुजाहेद हाजी कुरेशी (सर्व रा. खडकत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक तसेच गोवंश तस्करीविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.