

आष्टी ः पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून 25 तोळे सोने व गॅस सिलिंडरची मागणी केल्याप्रकरणी आष्टी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) आरोपी पतीस दोषी ठरवत 18 महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच 7 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून त्यापैकी 6 हजार रुपये फिर्यादी महिलेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
29 मे 2026 रोजी आष्टी येथील जेएमएफसी न्यायालय क्रमांक 3 चे न्यायाधीश महेश आर. बडाख यांनी हा निकाल दिला. आरोपी शंभूराज मोहनराव खलाटे (रा. खुंटे, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498-अ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह 11 जून 2015 रोजी आरोपी शंभूराज खलाटे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू असताना आरोपीने पत्नीवर 25 तोळे सोने व गॅस सिलिंडर आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
मागणी पूर्ण न झाल्याने पत्नीला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला. तसेच तिचा शारीरिक छळ करून मारहाण करण्यात आली व काही वेळा उपाशी ठेवण्यात आल्याचेही न्यायालयासमोर आले. फिर्यादीने न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार, माहेरहून सोन्याची व्यवस्था करून आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता.
मागणी पूर्ण न झाल्याने डिसेंबर 2015 मध्ये तिला घराबाहेर काढण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने माहेरी जाऊनही तिचा छळ केल्याचे पुराव्यांमधून स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणात सरकार पक्षाने फिर्यादी महिलेसह एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील कागदपत्रांचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचा छळाचा आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अशोक दगडू केदार यांनी केला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता व्ही. एस. गव्हाळे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी धरत शिक्षा सुनावली.