Washim News : मालेगाव येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला आजिवन कारावासाची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल

Washim News : मालेगाव येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपीला आजिवन कारावासाची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल
Published on
Updated on

अजय ढवळे

वाशिम : जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २३) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव येथील शुभम सुभाष चव्हाण याला न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने जिल्हाभरात या निकालाची चर्चा होत आहे.

काय होती घटना?

ही घटना १० नोव्हेंबर २०२४ रोजी मालेगाव जि. वाशिम येथे घडली होती. फिर्यादी आकाश कैलास पवार यांनी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शुभम सुभाष चव्हाण याने जुन्या वादाचा राग मनात धरून रोहित कैलास पवार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणात रोहितच्या मृत्यूनंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) (हत्या) नुसार वाढीव कलमे लावण्यात आली होती. हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) असल्याने याचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात आला.

तपासातील महत्त्वाचे टप्पे

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपास अधिकाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पुरावे गोळा केले, ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि तांत्रिक पुरावे यांचा समावेश होता. आरोपीने हा गुन्हा जुन्या वादातूनच केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

न्यायालयातील सुनावणी आणि निकाल

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात (DJ-03) या खटल्याची सुनावणी पार पडली. सरकारी वकील माधुरी मिसर (व्यास) आणि कोर्ट पैरवी पोलीस हवादार संतोष इंगोले यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली. सुनावणी दरम्यान एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अमरावती येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून प्राप्त झालेला अहवाल आरोपीच्या विरोधात गेल्याने पोलिसांची बाजू अधिक भक्कम झाली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले ठोस पुरावे ग्राह्य धरून, न्यायाधीशांनी २४ मार्च २०२६ रोजी आरोपी शुभम चव्हाण याला दोषी ठरवले. आरोपीला आजीवन सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या तपासात सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना पोलीस हवालदार आतिश काळमुंधळे आणि पोलीस शिपाई गणेश जाधव यांनी मोलाची मदत केली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news