

Ashti Tehsildar
कडा : आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांच्या कथित हुकूमशाही, दडपशाही व अपमानास्पद वर्तणुकी विरोधात आष्टी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तहसिलदारांची बदली होईपर्यंत कोणतेही कामकाज न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकारी यांना दि.२० जानेवारी २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. निवेदनानुसार, तहसिलदार पाटील या वारंवार अपमानास्पद, अर्वाच्य भाषेत बोलून मानसिक छळ करीत असून अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि.१९ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान ग्राम महसूल अधिकारी प्रवीण शिंदे यांनी बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या दोन व्यक्तींना बैठकीत आणून गोंधळ घातला.बैठकीदरम्यान अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीची धमकी देण्यात आली. हा सर्व प्रकार तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या समोर घडूनही, तहसिलदारांनी संबंधित गुंडांची बाजू घेत कर्मचाऱ्यांनाच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“माझी कुठेही तक्रार करा, कलेक्टरकडे जा किंवा मंत्र्याकडे जा. माझं कोणी काही करू शकत नाही", असे वक्तव्य करत कर्मचाऱ्यांना अपमानित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. “नोकरी सोडून द्या, तुम्ही नोकरीस लायक नाही, जनावरांसारखे आहात,” अशा शब्दांत वारंवार मानसिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आठवड्यातून किमान पाच दिवस बैठका घेतल्या जात असल्याने प्रत्यक्ष जनतेची कामे खोळंबत असून, काही मोजक्या ‘मर्जीतील’ अधिकाऱ्यांना वगळता इतर सर्वांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना शिपाई दर्जाहूनही खालची वागणूक दिली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
दि.१६ जानेवारी रोजी तालुका कार्यकारिणी निवडीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर तहसिलदार अधिक आक्रमक झाल्याने सूडभावनेतून त्रास वाढवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत महिला कर्मचारी उपस्थित असताना अर्वाच्य भाषेचा वापर केल्याने संतापाची लाट उसळली.
तहसिलदारांची बदली होईपर्यंत व संबंधित अधिकाऱ्यावर योग्य कारवाई होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले जाणार नाही,असा इशारा देत आष्टी तालुक्यातील ३७ ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. निवेदनावर अध्यक्ष अशोक सुरवसे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.