

Arrest the remaining accused in the Yash Dhaka case
बीड, पुढारी वृत्तसेवा यश ढाका हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड व कट रचणारा गणेश शिराळे याला आरोपी न करता पोलिस प्रशासन या गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश केला. या मोर्चात विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशचे आई-वडील, कुटुंब आणि नातेवाईकांनी देखील या मोर्चात सहभागी होऊन न्याय द्या म्हणून प्रशासनापुढे टाहो फोडला.
बीडमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चात उपस्थित अनेकांनी जमावाला संबोधित केले. न्याय द्या, यशच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा यासह बीड पोलिसांची भूमिका संशयास्पद अशा आशयाचे फलक हातात घेऊन आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते.
मास्टर माइंड गणेश शिराळे यास तत्काळ अटक करत गुन्हा नोंद करण्यात यावा. यश ढाका खून प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. यश ढाका खून प्रकरणातील खटला अंडर ट्रायल चालविण्यात यावा, यश ढाका खून खटल्यात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. यश ढाका यांच्या कुटुंबीयास पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करण्यात यावी, यश ढाका यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी. यश ढाका हत्याप्रकरणी फरार आरोर्पीना लवकरात लवकर अटक करावी.