

Supriya Sule: No politics, give justice to women!
वडवणी, पुढारी वृत्तसेवा वडवणी तालुक्यातील कवडगाव (बु.) येथे घडलेली डॉ. संपदा मुंडे यांची मृत्यूची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. कर्तृत्ववान, आत्मसन्मान असलेल्या या तरुण डॉक्टरने पोलिस प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्था, गैरवर्तन आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती असली तरी "ही आत्महत्या की हत्या?" हा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणात राजकारण नको, लेकीस न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवार (दि. ३ नोव्हेंबर) रोजी कवडगाव येथे भेट देऊन मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
या प्रसंगी कुटुंबीयाशी संवाद साधल्यानंतर खा. सुळे म्हणाल्या, तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असावा. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची नेमणूक करावी. सत्ताधाऱ्यांनी चुकीची वक्तव्ये करणे आणि मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. हे प्रकरण केवळ एका कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सन्मानाचे आहे.
सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सविस्तर माहिती खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. केंद्राने या दिशेने कठोर आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे. राज्यातील भ्रष्ट आणि निष्क्रिय यंत्रणेला आता आवर घालावा.
दरम्यान डॉ. संपदा मुंडे यांच्या आई वडिलांनी व्यथित स्वरात यावेळी आपले म्हणणे मांडले. त्यात त्यांनी सांगितले की, आमच्या मुलीचा मृत्यू हा केवळ आत्महत्या नाही, तिच्या आत्मसन्मानावर घाव घालणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा परिणाम आहे. आम्हाला सत्य हवंय, न्याय हवा आहे. दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे. सरकारने या प्रकरणाचा निष्पक्ष आणि वेगवान तपास करावा. या भेटीदरम्यान खासदार बजरंग सोन-वणे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार पृथ्व- ीराज साठे, मोहनराव जगताप, तसेच तालुकाध्यक्ष महादेव जमाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.