

Arbitrary behavior of stone crusher operators in Dharur Ghat
धारूर, पुढारी वृत्तसेवा खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वरील धारूर घाटात अपघातांची मालिका सुरू असतानाच खडी क्रशरचालकांकडून मनमानी पद्धतीने अवैध रस्ते तयार करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. करळ वळणाजवळ घाटाच्या मधोमध खडी क्रशरखरील ओव्हरलोड मालवाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले हे रस्ते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असून अपघातांना निमंत्रण देत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, धुनकवड पाटी ते धारूर या सुमारे 11 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही. याच मार्गावर तीन किलोमीटरचा अरुंद व अवघड वळणांचा घाट असल्याने यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले आहेत.
या दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशा परिस्थितीत घाटामध्ये अवैधरीत्या तयार केलेले रस्ते अपघातांचा धोका अधिक वाढवत आहेत. या रस्त्यांना परवानगी कोणी दिली ? ओव्हरलोड वाहतुकीला कोणाचे अभय आहे? प्रशासन याची चौकशी करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? संबंधित क्रशरचालकांची चौकशी करून अवैध रस्ते तातडीने बंद करावेत व दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे.