

Approval of seventeen irrigation projects pending for 3 years in Beed district cancelled
बीड पुढारी वृत्तसेवा :
दुष्काळी बीड जिल्ह्याला पाणीदार बनवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून १७ सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय मान्यतेसह निधी मंजूर होऊनही तीन वर्षांत प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली.
त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करून दुष्काळाच्या अतोनात झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का मानला जात असून राज्याचे वित्त मंत्री हे सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्या पालकत्वाला यामुळे जलसंपदा विभागाने चक्क आव्हान दिले असून अजित पवार यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडमध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये गाव तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे यांचा यात समावेश होता. जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्प रद्द करण्यासाठी दोन बैठका झाल्या.
या सिंचन प्रकल्पासाठी ५ कोटी ३३ लाखांचा निधी देण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ९०३ प्रकल्प हे रद्द केले खरे परंतु यात बीड जिल्ह्यातील १७प्रकल्पाचा समावेश असून एकीकडे मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्त करण्याच्या केलेल्या घोषणा ह्या यामुळे केवळ पोकळ घोषणाच ठरल्या आहेत. मार्थावाद्याने मद्युतीला भरभरून दिले, परंतु बीड जिल्ह्याच्या पदरात पुन्हा एकदा 'वंचितपण' पडले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल ९०३ विकास प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द झाल्याची माहिती, कालच समोर आली होती. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जे प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत, त्यामध्ये लघुपाटबंधारे योजना, कोअर पाड़ार बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. ज्या योजनांची अंमलबजावणी मागील तीन वर्षापासून रखडली होती, त्याच योजना बंद करण्यात आल्या आहेत.
बीड तालुक्यातील उमरी, नागापूर बुद्रुक येथील कोल्हापुरी बंधारा, वंजारवाडी येथील गाव तलाव, आष्टी तालुक्यातील पांगरा, घाटा, जोगेश्वरी पारगाव, गंगादेवी येथील पाझर तलाव, अंबाजोगाईतील पूस येथील गावतलाव, घारुरच्या अंबाचौंडी येथील कोल्हापुरी बंधारा, माजलगावच्या बाहेगव्हाण येथील गाव तलाव, पाटोदा तालुक्यातील करंजवण, नाळवंडी सस्ते वस्ती येथील पाझर तलाव, बांगरवाडी येथील गाव तलाव, शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी, येवलवाडी, जानपीरवाडी वढोरकरवाडी येथील पाझर व गाव तलाव, गेवराईच्या खळेगावमधील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा हे प्रकल्प रद्द केले आहेत.