

Another case registered in the Muktai Urban matter; action taken against 18 individuals
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगावातील मुक्ताई अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ठेवीदारांची फसवणूक, विश्वासधात आणि बनावट आश्वासने देऊन निधी उभारल्याचा आरोप करत संस्थेशी संबंधित १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या संस्थेविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी आणि गुन्हे दाखल झालेले असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अटक न झाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार गुन्हे नोंद होऊनही संबंधित आरोपी मोकाट कसे, असा सवाल आता ठेवीदारांकडून उपस्थित केला जात आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संस्थेने आकर्षक व्याजदर, सुरक्षित गुंतवणूक आणि मुदतपूर्तीनंतर रक्कम परत देण्याचे आमिष दाखवत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या. मात्र मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही.
अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी, व्यवसायासाठी आणि वृद्धापकाळाच्या आधारासाठी साठवलेली रक्कम संस्थेत गुंतवली होती. आज हीच बचत अडकून पडल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पोलिस तपासात संस्थेच्या विविध शाखांतील व्यवहार, कागदपत्रे आणि ठेवीदारांच्या तक्रारींची छाननी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ठेवीदारांची दिशाभूल करून निधी उभारण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास माजलगाव शहर पोलिस करत असून, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपींची मालमत्ता, व्यवहार आणि निधीचा प्रवाह यांची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ठेवीदारांना न्याय मिळेल का, हा प्रश्न कायम असतानाच वारंवार गुन्हे दाखल होऊनही आरोपीवर कठोर कारवाई होत नसल्याने तपास यंत्रणेच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
ठेवीदारांसाठी धोक्याची घंटा!
मुक्ताई अर्बन प्रकरणामुळे पुन्हा एकदा सहकारी पतसंस्था आणि मल्टीस्टेट संस्थांमधील गुंतवणुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता संस्थेची आर्थिक स्थिती, लेखापरीक्षण अहवाल, नोंदणीची वैधता आणि नियामक यंत्रणांकडील माहिती तपासूनच गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये विश्वांभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास साँदर, मागवत गंगात्रे, विशाल गोरे, केशव जोगडे, स्वाती सनाते, अशोक चिगुरे, मोतीराम सिरसट, परमेश्वर कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सक्राते, विठ्ठल सक्राते, उद्धव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके आणि रमेश ऊर्फ दगडुबा यादव यांचा समावेश आहे.