

भूम : शहरातील वाढत्या बांधकामांच्या पार्श्वभूमीवर वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, या संधीचा फायदा घेत काही वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा व्यवसाय तेजीत सुरू केल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळूची वाहने शहरात दाखल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील विविध भागांत निवासी घरे, व्यापारी संकुले तसेच इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या बांधकामांसाठी लागणारी वाळू बाणगंगा आणि सीना नदीपात्रातून अवैधरीत्या उपसा करून शहरात आणली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत ट्रॅक्टर, टिपर आणि इतर वाहनांद्वारे वाळूची वाहतूक सुरू असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय, बांधकामांसाठी वापरण्यात येणारी दर्जेदार वाळू गंगाखेड आणि गेवराई (जि. बीड) परिसरातील गोदावरी नदीपात्रातून आणली जात असल्याची माहिती समोर येत आहे. ही वाळू विविध मार्गांनी शहरात पोहोचवून अनेक ठिकाणी साठवली जात असल्याचेही सांगितले जात आहे.
शहरातील विविध भागांत वाळूचे ढीग उघडपणे दिसत असतानाही संबंधित विभागांकडून चौकशी अथवा कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नियमांनुसार वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी शासनाची परवानगी, रॉयल्टी आणि आवश्यक कागदपत्रे बंधनकारक आहेत.
मात्र, शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची प्रभावी तपासणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रांचे नुकसान होण्याबरोबरच भूजल पातळीवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नदीकाठच्या शेती क्षेत्रालाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळे हा विषय केवळ महसुली नुकसानीपुरता मर्यादित नसून पर्यावरणीय दृष्ट्याही गंभीर बनला आहे.
तपासणीसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना
शहरामध्ये येणाऱ्या वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने वाळू वाहतुकीची नियमित तपासणी केली जाईल. संबंधित वाहनांकडे वैध रॉयल्टी व आवश्यक कागदपत्रे असल्यास कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, अनधिकृतपणे वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.
दोषींवर कठोर कारवाई करा
भूम तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आहे. गाव पुढारी वाळू उपसा करताना स्थानिकच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळूचा उपसा करून विकत आहेत. या प्रकरणामुळे अनेक वाद व तंटे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीस जबाबदार असलेल्यांवर तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी असे प्रल्हाद आडगळे यांनी सांगितले.