

inquiry declaration living baby Swarati dead
बीड, पुढारी वृत्तसेवा: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकाला योग्यरीत्या तपासणी न करता मृत घोषित केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला होता. या प्रकरणात पालकाची तक्रार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे असून अंतर्गत चौकशीसाठी दोन समिती नियुक्त केल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी दिली. तर त्या बालकावर सच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
केज तालुक्यातील होळ येथील बालिका घुगे ही महिला सोमवारी रात्री स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल झाली होती. गर्भवती असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने त्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता गर्भजल निघून गेल्याने नैसर्गिक गर्भपात करणे गरजेचे होते. २७ आठवड्याची प्रेग्नन्सी असल्याने बाळाचे वजन कमी होते. सोमवारी रात्री ८ वाजता प्रसूती झाल्यानंतर बाळाची तपासणी करण्यात आली परंतु बाळाचा रिस्पॉन्स मिळाला नाही.
त्यामुळे बाळाला वॉर्मरमध्ये ठेवले, परंतु शेवटपर्यंत रिस्पॉन्स दिसून न आल्याने सकाळी बाळ नातेवाईकांकडे सुपूर्द केले होते. नातेवाईकांनी सुद्धा त्या बाळाला पाहिले परंतु त्यांना हालचाल जाणवली नाही. परंतु घरी गेल्यानंतर बाळाने हालचाल केली. अशी घटना खूप दुर्मिळ असते. परंतु यामध्ये कोणताही निष्काळजीपणा नसल्याची माहिती प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. तोंडगे यांनी दिली.
तर या सर्व प्रकरणाची प्राथमिक माहिती आम्ही घेतली असून आता त्याच विभागाचे प्रमुख इतर डॉक्टरांची तसेच दुसऱ्या विभागातील प्राध्यापक अशा दोन समिती नियुक्त केल्या असून त्यांच्या माध्यमातून आलेल्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. परंतु सदरील बालकाच्या कुटुंबियांची कोणतीही तक्रार नसल्याचे प्रभारी अधिष्ठाता राजेश कचरे यांनी सांगितले.