

An all-party condolence meeting was held in Ambajogai; tributes were paid
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवाः महाराष्ट्राचे लोकप्रिय लोकनेते व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे कर्तृत्ववान, शिस्तप्रिय, वक्तशीर आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व होते. त्यांनी कधीही जातीधर्माचा विचार न करता सर्वसामान्य जनतेसाठी काम केले. त्यामुळेच ते जातीधर्माच्या पलीकडचे लोकनेते होते, अशा भावना अंबाजोगाई येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या.
लोक विकास महाआघाडीचे नेते राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) शहरातील वेणुताई चव्हाण महिला नाळ महाविद्यालयाच्या प्रांगणात ही शोकसभा पार पडली. यावेळी माजी आमदार संजय दौंड यांनी अजितदादांचे स्वअनुभव सांगत ते उत्तम राजकारणी असण्यासोबतच शेतीशी जोडलेले, मातीशी नाते जपणारे नेतृत्व होते, असे सांगितले.
माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अजितदादा हे शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक असून प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणारे आणि ग्रामीण प्रश्नांची जाण असलेले नेते होते, असे नमूद केले. प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दादांची प्रशासनावर असलेली पकड, शिस्तप्रियता आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत अधोरेखित केली.
दादांच्या समाजसे-वेचा वारसा पुढे नेण्याचे अभिवचन त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दादा हे सर्वसामान्यांना आपले वाटणारे विकासप्रिय नेतृत्व होते, असे सांगितले. भाजप नेते अक्षय मुंदडा यांनी दादांची कर्तव्यनिष्ठा आणि शिस्त यांचा उल्लेख करत त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, असे मत व्यक्त केले.
यावेळी विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, वकील तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेचे सूत्रसंचालन कवी भागवत मसने यांनी केले, तर मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी सहकार्य केले.