

Ambajogai Two bikes collide head-on three death one injured
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा: अंबाजोगाई तालुक्यातील बरदापूर-हातोला रस्त्यावर लिमगाव पाटीजवळ शनिवार (दि.२८) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अभय सतीश चव्हाण (२५), फारुक पठाण व नासिर शेख (दोघे रा. पानगाव, जि. लातूर) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर ऋषीकेश चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. अभय चव्हाण आणि ऋषिकेश अशोक चव्हाण हे दुचाकीवरून वेगाने बर्दापूर-वरुन हातोलाकडे जात असताना लिमगाव पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी जोरदार धडक झाली.
या अपघातात अभय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश चव्हाण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, समोरच्या दिशेने पानगाव येथून येऊन बर्दापूरकडे जाणारे दुचाकीवरील फारुख पठाण व नासिर शेख हे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूर येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्यांचे निधन झाले.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मयत तथा जखमीस अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असतांना दोघांना त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्याचा निर्णय घेऊन लातूरला नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.