

Delhi Student Protest Support
अंबाजोगाई : दिल्लीतील जंतर-मंतर येथे परीक्षा पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याचा अंबाजोगाई येथील 'संविधानप्रेमी विधिज्ञ वकील संघा'च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह देशाच्या राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशात सातत्याने होत असलेल्या परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून, मानसिक तणावामुळे अनेक विद्यार्थ्यांना टोकाची पावले उचलावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, आवश्यक सुधारणा करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे अहिंसक आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनीही बेमुदत उपोषण सुरू केले होते.
मात्र, २६ जून रोजी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा देशभरातून निषेध व्यक्त होत असल्याचेही सांगण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
जंतर-मंतरवरील विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
देशातील वाढत्या पेपरफुटीच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा.
विद्यार्थ्यांचे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी भारतीय शिक्षण व्यवस्थेत पारदर्शक, सक्षम आणि व्यापक सुधारणा तातडीने लागू कराव्यात.
कायद्याचे अभ्यासक आणि संविधानाचे रक्षक म्हणून अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे आपले कर्तव्य असल्याचे नमूद करत, राष्ट्रपतींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी 'संविधानप्रेमी विधिज्ञ वकील संघ, अंबाजोगाई'च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या निवेदनावर ॲड. अजय बुरांडे, ॲड. बाबुराव तिडके, ॲड. माणिक आदमाने, ॲड. माधव जाधव, ॲड. इस्माईल गवळी, ॲड. विलास लोखंडे, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. विजय चव्हाण, ॲड. दिलीप गोरे, ॲड. सचिन शेप यांच्यासह अनेक विधिज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत.