Beed News | घळाटवाडीच्या सरपंच संगिता येताळ अपात्र; तीन अपत्य प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

फौजदारी कारवाईसाठी चौकशीचे आदेश : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडीच्या सरपंच अपील मंजूर
Beed News | घळाटवाडीच्या सरपंच संगिता येताळ अपात्र; तीन अपत्य प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Published on
Updated on

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता हरीभाऊ येताळ यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १४ (ज-१) अन्वये सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. तीन अपत्ये असतानाही नामनिर्देशनपत्र दाखल करताना दोनच अपत्ये असल्याचे स्वयंघोषणापत्र सादर करून माहिती लपविल्याचा आरोप करीत विशाल चांगदेव ससाणे यांनी दाखल केलेले अपील जिल्हाधिकारी बीड यांनी मंजूर केले आहे. १६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय दिला.

अर्जदार विशाल चांगदेव ससाणे यांच्या म्हणण्यानुसार, संगिता येताळ यांनी सरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना दोनच अपत्ये असल्याचे स्वयंघोषणापत्र दिले होते. मात्र, त्यांचा पती हरिभाऊ येताळ यांच्या कुटुंबातील तीन अपत्यांच्या शाळेतील प्रवेश-निर्गम अभिलेखांच्या प्रती सादर करण्यात आल्या. यामध्ये अंजना हरिभाऊ येताळ हिची जन्मतारीख २० ऑक्टोबर १९९७, वैजनाथ हरिभाऊ येताळ यांची जन्मतारीख ९ मार्च २००१ आणि नवनाथ हरिभाऊ येताळ यांची जन्मतारीख ४ एप्रिल २००३ अशी नमूद असल्याचे सांगण्यात आले.

अर्जदाराने असा दावा केला की, १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य जन्माला आल्यास संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. त्यामुळे ४ एप्रिल २००३ रोजी जन्मलेल्या नवनाथ यांच्या जन्मतारखेच्या आधारे संगिता येताळ या सरपंच पदासाठी अपात्र ठरतात, असा युक्तिवाद करण्यात आला. तसेच अपत्यांची संख्या लपवून शासन, निवडणूक प्रशासन आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला.

दुसरीकडे, संगिता येताळ यांच्यावतीने या आरोपांना विरोध करण्यात आला. अंजना ही त्यांची मुलगी नसून त्यांचे पती हरिभाऊ येताळ यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचा बचाव घेण्यात आला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर हरिभाऊ येताळ यांनी संगिता यांच्याशी दुसरे लग्न केले आणि त्यानंतर वैजनाथ व नवनाथ ही दोन अपत्ये झाल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नामनिर्देशनपत्रात दोन अपत्यांची माहिती देणे योग्य असल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, या बचावासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. न्यायाधिकरणातील प्रकरणाच्या अर्ज व निर्णयप्रतीमध्ये पहिल्या पत्नी संगीता हरिभाऊ येताळ यांच्या मृत्यूची तारीख २७ मे १९९४ अशी नमूद असल्याचे दिसून आले. तर सादर करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूची तारीख २५ मार्च १९९८ अशी नमूद असल्याने दोन्ही कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले.

उपलब्ध शाळेचे अभिलेख, नामनिर्देशनपत्रातील माहिती, स्वयंघोषणापत्र तसेच दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि इतर कागदपत्रांचा विचार केल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी विशाल चांगदेव ससाणे यांचे अपील मंजूर केले. आदेशानुसार, संगिता हरीभाऊ येताळ यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १४ (ज-१) अन्वये घळाटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

तसेच नामनिर्देशनपत्रामध्ये चुकीची माहिती सादर करून शासन, निवडणूक प्रशासन व मतदारांची दिशाभूल केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने संगिता येताळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच इतर लागू कायद्यांनुसार फौजदारी कारवाई करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी, पंचायत समिती माजलगाव यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर घळाटवाडी ग्रामपंचायतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news