

Truck Battery Short Circuit Fire
अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव शिवारात शुक्रवारी (दि.९) दुपारी ऊस तोडणी सुरू असताना एका दहा टायर ट्रकच्या बॅटरीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत शेतकरी पार्थ उत्तम सोळंके यांचा काढणीला आलेला चार एकर ऊस आणि संबंधित ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळगाव येथील सोळंके यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. तोडलेला ऊस वाहून नेण्यासाठी आलेल्या ट्रकच्या चालकाने गाडी सुरू करण्यासाठी 'सेल्फ' मारला असता, बॅटरीमध्ये अचानक स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ऊस भरण्यासाठी उभा असलेला ट्रक आणि शेतातील उभा ऊस आगीच्या विळख्यात सापडला.
या दुर्घटनेत ट्रकचे आणि शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तोडणीला आलेला ऊस डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठे नुकसान टाळता आले नाही. महसूल विभागाकडून या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.