

केज : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या संदर्भात खा. शरद पवार यांनी आज (दि.२१) दुपारी भेट दिल्यानंतर पुन्हा चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून आरोपींना फाशी होण्यासंदर्भात सखोल चौकशी केली जाईल. यात राजकीय हस्तक्षेप टाळून मास्टरमाईंडला देखील अटक केली जाईल, असे गावकऱ्यांना आश्वासन दिले. मात्र, त्यांनी तो मास्टरमाईंड कोण ? याचा उल्लेख टाळला.
शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना भेटून त्यांचे सात्वन करण्यासाठी आले होते. त्यांच्या सोबत आमदार अमोल मिटकरी, योगेश क्षीरसागर, रमेश आडसकर हे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील या दुर्दैव हत्या माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. हत्याकांडातील कोणत्याही आरोपींना सोडणार नसून त्यांना फाशीच्या शिक्षा व्हावी, यासाठी सखोल तपास केला जाईल. तसेच यात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही.
या संदर्भाा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यां मार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यात त्रुटी राहू नयेत म्हणून न्यायालयीन चौकशी देखील केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माइंडला देखील अटक करण्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो मास्टरमाइंड कोण ? याचा त्यांनी उल्लेख टाळला.
अजित पवार देशमुख कुटुंबियांचे भेट घेऊन गाडीत बसत असताना जमावाने मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा. तसेच मास्टरमाईंड वाल्मीक कराड याला तत्काळ अटक करा. अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. मात्र, त्यावेळी अजित पवार हे न थांबता गाडीत बसून निघून गेले.
अजित दादांच्या भेटी बाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संजीवनी देशमुख या म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेरा दिवस उलटले आहेत. आज त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम आहे. अद्यापही यातील सर्व आरोपी अटक नाहीत. अजित पवार यांनी येथे येऊन त्यांनी आमचा अपमान केलेला आहे. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांनी येथे फोटोसेशन करणे. हे अत्यंत दुर्दैवी असून त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.