

परळी वैजनाथ :अद्वैत वेदांताच्या प्रचार-प्रसारासाठी देशभर धर्मजागृती करणाऱ्या म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी सोमवारी (दि. 23) बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. महास्वामीजीचे परळी नगरीत आगमन होताच भाविकांनी मंगलवाद्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.
महास्वामीजींच्या स्वागतासाठी परळीकर धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने एकवटले होते. संत जगमित्र नागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी भव्य स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. वैद्यनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर महास्वामीजींनी वेदोक्त मंत्रोच्चारात प्रभू वैद्यनाथाला अभिषेक घातला. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त राजेश देशमुख आणि प्रा. प्रदीप देशमुख यांनी महास्वामीजींचा शाल, पुष्पहार आणि प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
दर्शनानंतर महास्वामींनी मंदिर परिसरातील पौराणिक वास्तूंचे बारकाईने निरीक्षण केले. पार्वती मातेचे स्थान, बारा ज्योतिर्लिंग देवालये, नारद मंदिर आणि प्राचीन अवशेष पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा जाज्वल्य वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केला आहे,’‘’ अशा शब्दांत त्यांनी मंदिराच्या व्यवस्थेचे कौतुक केले.
विशेष म्हणजे, महास्वामीनी उत्तर पायऱ्यांवरील आद्य शंकराचार्य मंदिराला आवर्जून भेट दिली. “आद्य शंकराचार्यांनी बारा ज्योतिर्लिंगांची विजय यात्रा करताना परळी वैजनाथला भेट दिली होती. हा पौराणिक आणि ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
चारही पिठांच्या शंकराचार्यांच्या आज्ञेनुसार आपण ही विजय यात्रा करत असून, आद्य शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत दर्शन लाभणे हे महदभाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर दर्शन मंडपात महास्वामींनी उपस्थित भाविकांना आशीर्वाद दिले.
यावेळी परळीकरांच्या वतीने नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व अन्य मान्यवरांनी महास्वामीजींचे पूजन करून आत्मीय स्वागत केले. या सोहळ्याला परळीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते.