

According to the Hyderabad Gazette, give ST reservation to the Gorbanjara community
धारूर, पुढारी वृत्तसेवा : निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ च्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातींची नोंद अनुसूचित जमात म्हणून असून तेलंगणा व आंध्र प्रदेशात या समाजाला एस.टी. आरक्षण मिळते.
मात्र राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्रात ते आरक्षण रद्द झाले. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण दिल्याप्रमाणेच गोरबंजारा समाजालाही एस.टी. आरक्षण द्यावे, अशी मागणी गोरसेना व सकल गोर बंजारा समाजाने धारूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ या काळातल्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातीची नोंद जमात अशी झालेली होती. त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले. मात्र, १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा, विदर्भ व खानदेश महाराष्ट्रात सामील झाल्याने मूळ आरक्षण रद्द होऊन विमुक्त जातीच्या संवर्गात या समाजाचा समावेश करण्यात आला.
त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर मोठा अन्याय झाला आहे. नुकत्याच फडणवीस सरकारने मराठा-कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाचा जी. आर. काढला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजालाही एस.टी. आरक्षण मिळावे, अशी मागणी गोरसेना व सकल गोर बंजारा समाज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.
गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर ही निवेदने देण्यात आली. यामध्ये नमूद करण्यात आले की, १९५० पूर्वीच्या अनुसूचित जमातीचे पुरावे, क्रिमिनल ट्राईब कायद्याचा इतिहास, स्वतंत्र बोलीभाषा, परंपरा, तांडावस्ती या सर्व बाबींची पात्रता असूनही गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण नाकारले गेले. बापट आयोग, इधाते आयोग, भाटीया आयोग, डीएनटी-एसटी आयोग या सर्वांनी गोरबंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी केल्या असूनही सरकारने दुर्लक्ष केले, असा आरोप निवेदनात करण्यात आला.
यावेळी देवानंद राठोड, विनोद राठोड, अमित राठोड, सचिन नाईक, बाजीराव राठोड, अप्पाराव राठोड, दत्ता महाराज राठोड, रविकांतदादा राठोड, बंडू राठोड, रणजित राठोड, रामराव राठोड, अरुण इसळावत, बाळू चव्हाण, सचिन राठोड, हनुमंत राठोड, अमोल राठोड, काळू राठोड, नामदेव आडे, रंजीत राठोड, बाळू राठोड, मच्छींद्र राठोड आदींसह विविध तंड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.