

A young man was brutally murdered in Beed by being bludgeoned with a stone
शिरूर कासार, पुढारी वृत्तसेवा :
चाँद तांबोळी
शिरूर तालुक्यातील दगडवाडी शिवारात एका ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २) सकाळी उघडकीस आली. चाँद ऊर्फ गुड्डू अलाउद्दीन तांबोळी असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे, मयत तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पाटोदा पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चाँद तांबोळी याने रविवारी (दि. १) रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांना फोन केला होता. मी निरगुडी येथे जात आहे, असे त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर काही वेळाने नातेवाईकांनी त्याला फोन केला असता, त्याने तो उचलला नाही. रात्रभर त्याचा फोन नॉट रिचेबल होता आणि तो घरीही परतला नाही. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळीच पाटोदा पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
एकीकडे पोलिस आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते, तर दुसरीकडे सोमवारी सकाळी दूध घेऊन बीडकडे जाणाऱ्या एका शेतकऱ्याला दगडवाडी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसून आला. चेहरा दगडाने ठेचलेला होता. याची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खात्री केली असता, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या चाँद तांबोळी याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
मोबाईलमध्ये दडलेय गुपीत ? : हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, चाँद तांबोळी याच्याकडे दोन मोबाईल होते. रविवारी रात्री शेवटचा कॉल कोणाला आला होता किंवा त्याने कोणाला संपर्क केला होता, यावरून हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मोबाईलचा शोध घेण्यासह तांत्रिक तपासावर भर दिला आहे. पोलिस आता त्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.