

A thrilling incident of a burning car in Beed
बीड, पुढारी वृत्तसेवा :
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटात मंगळवारी (दि. ४) रात्री १० वाजेच्या सुमारास मबर्निंग कारफ्वा थरार पहायला मिळाला. धावत्या कारमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत पत्नी व मुलांना खाली उतरवल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. या आगीत कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी वितेश खंडाळे हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची कार मांजरसुंबा घाटात आली असता, इंजिनमधून अचानक धूर निघू लागला.
वितेश खंडाळे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. धोका ओळखून खंडाळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पत्नी आणि दोन्ही मुलांना गाडीतून खाली उतरवले आणि सुरक्षित अंतरावर नेले.
पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि पेट्रोल कार असल्याने काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. खंडाळे यांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कुटुंब सुखरूप बचावले असले तरी, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.