

A new traffic park and entertainment center will be built in Beed city
बीड, पुढारी वृत्तसेवा शहरातील नागरिकांसाठी आणि वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी प्रस्तावित असलेल्या नवीन ट्रॅफिक पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या उभारणीबाबत नुकतीच एक महत्त्वाची प्रशासकीय बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली असून, यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या बैठकीत प्रकल्पाच्या सादरीकरणादरम्यान विविध नागरी सुविधा आणि वाहतूक सिम्युलेशन ट्रॅकची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांसमोर देण्यात आली. या प्रस्तावित ट्रैफिक पार्कमध्ये टी-जंक्शन, ट्रॅफिक सर्कल, क्रॉस जंक्शन आणि राऊंडअबाऊट यांसारख्या विविध वाहतूक रचनांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना आणि विशेषतः वाहनचालकांना प्रत्यक्ष अनुभव आणि टेस्ट ड्राईव्ह करता यावी यासाठी सिंगल लेन आणि डबल लेन रस्त्यांची रचना या ठिकाणी केली जाणार आहे.
केवळ वाहतूक शिक्षणापुरते मर्यादित न राहता या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी देखील विशेष सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार, चौपाटीच्या धर्तीवर छोटी खाद्यपदार्थांची दुकाने आणि नदीच्या बाजूला पाहता येईल असे एक अॅम्फीथिएटर उभारण्याचे या आराखड्यात प्रस्तावित आहे.
तसेच, नागरिकांना चालण्यासाठी स्वतंत्र फूटपाथ, संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीचे दिशादर्शक फलक, रंगवलेल्या सायकल लेन, बसण्यासाठी झाडांच्या खाली विशेष व्यवस्था आणि ग्रॅस पेव्हर्स बसवण्यात येणार आहेत. संध्याकाळच्या वेळी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक उत्तम विरंगुळ्याचे ठिकाण बनेल यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला असून, सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत करण्याबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्देशित केले.
या संपूर्ण प्रकल्पाच्या आर्थिक आणि तांत्रिक बाजूवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बांधकाम प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने उत्खनन, पीसीसी आणि स्टॅम्प काँक्रीटचा वापर केला जाणार असून, स्टॅम्प काँक्रीटसाठी सुमारे ४० लाख रुपये आणि पेव्हिंग ब्लॉकसाठी साडेदहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
जीएसटीसह या मूळ प्रकल्पाचा अंदाजित खर्च १.८६ कोटी ते २.४ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता सादरीकरणात वर्तवण्यात आली. हा नियोजित प्रकल्प नदीकाठच्या पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नदीच्या बाजूने एक भक्कम रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधणे अत्यंत गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या संरक्षक भिंतीसाठी स्वतंत्रपणे सुमारे १ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित असून, या संपूर्ण प्रकल्पाच्या तांत्रिक मान्यतेसाठी आणि पुढील प्रशासकीय प्रक्रियेसाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीला पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत