

A magnificent manifestation of 'Adiyogi' at the darbar of the King of Beed this year
बीड, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवातील भव्य देखावे आणि देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या अप्रतिम प्रतिकृतींसाठी ख्यातनाम असलेल्या 'बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळा'ने यंदा आपल्या ७२व्या वर्षात पदार्पण करताना भव्यतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. मंडळाच्या दरबारात यंदा कोयंबतूर येथील प्रसिद्ध आदियोगीच्या संकल्पनेवर आधारित तब्बल २८ फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आली असून, ती गणेशभक्त आणि भाविकांसाठी यंदाच्या उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून बीडकरांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभूती देणारा अनुभव आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. केदारनाथ, अमरनाथ, महावैष्णो देवी, तिरुपती तसेच गेल्या वर्षी साकारलेल्या रामेश्वरम धामाच्या भव्य प्रतिकृतींनी संपूर्ण जिल्ह्यात मंडळाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याच भव्य आणि समृद्ध परंपरेचा विस्तार करत यंदा मंदिरांच्या प्रतिकृर्तपिक्षा वेगळी आणि आधुनिक संकल्पना साकारण्यात आली आहे. २८ फूट उंच आदियोगीच्या भव्य मूर्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, यामध्ये प्रोजेक्शन मॅपिंग, आकर्षक प्रकाशयोजना तसेच भव्य लेझर लाइट शोचे सादरीकरण केले जाणार आहे.
त्यामुळे यंदाचा हा देखावा केवळ पारंपरिक धार्मिक सादरीकरण न राहता अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अद्वितीय दृक्-श्राव्य संगम ठरणार आहे. आदियोगीच्या विराट रूपाला प्रकाश, लेझर आणि प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून साकारण्यात येणारे विविध दृश्य परिणाम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने विठ्ठल मंदिर चौक येथे गणेशमूर्तीच्या आगमनाचा विशेष भव्य सोहळा आयोजित केला आहे. मंडळाने पेण येथून आणलेल्या सर्वांगसुंदर गणेशमूर्तीचे आगमन विशेष शोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या बैठकीचे नेटके सूत्रसंचालन मागील वर्षाचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य संतोष पवार, जयमल्हार बागल, भागीरथ मुंदडा, चंद्रकांत राव कुलकर्णी, गिरीश करवा, दत्ता तळेकर, मनोज परिख, फमजी परिख, सतीश पगरिया, अभिजित पगरिया यांच्यासह प्रीतम गिल्डा, नरेश मुंदडा, प्रगेश कुलकर्णी, अजय शहाणे, शुभम शर्मा, राम पारीक, शाम पारेख, प्रमोद कोरे, अमोल गवळी, ऋषिकेश करवा, गोविंद शर्मा, रवी बागल, सिद्धार्थ गिलडा, कल्पेश मुंदडा, ओम चरखा, मंगेश बोरा, राकेश डहाळे, गणेश पवार, कृष्णा शिंदे, अजय सोनी, निशांत लड्डा, सागर परिख, गजानन पारिख, निलेश घुमरे, आदित्य आगळे, हर्ष सोनी, मयूर सोनी, युवराज वांडरे आणि गणेश जोगदंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते-