Beed News : न्यायाच्या प्रतीक्षेत वृद्धाचा आत्मदहनाचा इशारा!

मुलाकडून सांभाळ नाही, प्रशासनाकडून निर्णय नाही; ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हतबल
Elderly Man Protest
न्यायाच्या प्रतीक्षेत वृद्धाचा आत्मदहनाचा इशारा!pudhari photo
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : वृद्धापकाळ हा आयुष्याचा आधार आणि सन्मानाने जगण्याचा काळ मानला जातो. मात्र समाजात वाढत्या कौटुंबिक विघटनाच्या आणि संवेदनशून्यतेच्या घटनांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना जगण्यासाठीच संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथील ७६ वर्षीय वसंत भगवान पारखे यांनी मुलाकडून सांभाळ मिळत नसल्याने आणि न्यायासाठी केलेल्या अर्जावर आठ महिन्यांपासून निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ आज (दि. १७ जून) तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Elderly Man Protest
Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी

वसंत पारखे हे वयोवृद्ध असून मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. दररोज औषधोपचार केल्याशिवाय त्यांचे जगणे कठीण आहे. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने औषधांसाठीही पैसे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पारखे यांचा आरोप आहे की, त्यांचा माध्यमिक शिक्षक असलेला मुलगा संतोष पारखे याने त्यांचा सांभाळ करण्यास नकार देत त्यांना घराबाहेर काढले. त्यामुळे उपजीविका, औषधोपचार आणि देखभालीसाठी मुलाकडून पोटगी मिळावी यासाठी त्यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अंबाजोगाई यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र तब्बल आठ महिने उलटूनही या अर्जावर कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, उदरनिर्वाह आणि औषधोपचारांचा खर्च त्यांनी उधारीवर चालवला. परंतु वाढत्या कर्जामुळे आता औषधे घेणेही अशक्य झाले आहे. याच नैराश्यातून त्यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. मात्र त्याचीही दखल न घेतल्याने अखेर आत्मदहनाचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी कायदे अस्तित्वात असताना प्रत्यक्षात अनेक वृद्धांना न्यायासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कौटुंबिक आधार हरवलेला, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि आजारांनी ग्रस्त असलेल्या वृद्धाला न्याय मिळण्यात होणारा विलंब ही केवळ प्रशासकीय बाब नसून सामाजिक संवेदनशीलतेची कसोटी आहे.

Elderly Man Protest
Drug addiction | अमली पदार्थांची मगरमिठी

एका बाजूला वृद्धांच्या सन्मानाचे गोडवे गायले जातात, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलाकडून सांभाळ मिळावा म्हणून एका वृद्धाला प्रशासनाचे दरवाजे ठोठवावे लागतात, ही बाब चिंताजनक आहे. समाजाच्या प्रगतीच्या गप्पा मारताना वृद्धांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष होत असेल, तर ती प्रगती कितपत मानवी आहे, असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे.

प्रशासन जागे झाले

वसंत पारखे यांनी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात १७ जून रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन किंवा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे. आता संबंधित प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि या वृद्धाला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझ्या नावावरील जमीन पत्नीच्या नावावर केल्यानंतर मुलगा आईला घेऊन अंबाजोगाई येथे राहू लागला. मला घरातून बाहेर काढण्यात आले. पोटगीसाठी अर्ज करून आठ महिने झाले, पण अजूनही न्याय मिळालेला नाही. आजारपणामुळे औषधांशिवाय जगणे शक्य नाही. आता अन्न, पाणी आणि औषधोपचाराविना तडफडत जगण्यापेक्षा आत्मदहन करणेच योग्य वाटत आहे."

वसंत भगवान पारखे, साळेगाव (ता. केज)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news