धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार | पुढारी

धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आर- क्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून राज्य सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा देत भारत सोन्नर यांनी मंगळवारी (दि. ५) आंदोलनाचा भंडारा उधळला. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथून त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी कायमस्वरुपी बाजूला ठेवली. यामुळे धनगर समाजाने काय घोडे मारले? असा सवाल करत भारत सोन्नर यांनी आजही राज्यातील ५० पेक्षा अधिक विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक ताकद आहे. डोंगर भागात राहणाऱ्या धनगरांना वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. फक्त धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवायचा, नंतर वापरा आणि फेका ही निती अवलंबायची, हे सर्वच राजकीय पक्षांचे धोरण आहे. राजकारण्यांना केवळ निवडणुकीपुरती समाजाच्या वेदनांची जाणीव होते. त्यावेळीच आश्वासने दिली जातात.

निवडणुक पार पडल्यानंतर मात्र धनगर आरक्षणाच्या मूळ मुद्द्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. यामुळेच धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, मेंढपाळांचे रखडलेले प्रश्न, अनेक धनगर वस्त्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे समाज आता पेटून उठणार आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथून भंडारा उधळून एल्गार करण्यात येत आहे. आता आरक्षण घेतल्या शिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा यशवंत सेना धनगर समाजाचे नेते सोन्नर यांनी दिला आहे.

Back to top button