Tamarind Tree Felled | विकासाच्या बुलडोझरखाली ५० वर्षांची चिंच जमीनदोस्त

चाकुरातील आठवणींचा सावलीदार साक्षीदार हरपला
Tamarind Tree Felled
Tamarind Tree Felled
Published on
Updated on

चाकूर : चाकूर शहराच्या जुन्या बसस्थानक परिसरात गेली तब्बल पाच दशके उभी असलेली, हजारो प्रवाशांना सावली देणारी आणि अनेक पिढ्यांच्या आठवणी जपणारी ऐतिहासिक चिंचेची वृक्षराजी मंगळवारी दुपारी विकासाच्या बुलडोझरखाली कायमची कोसळली. झाड पडताच केवळ एक वृक्ष नाही, तर चाकूरच्या इतिहासातील एक जिवंत पानच जणू मिटल्याची भावना नागरिकांच्या मनात दाटून आली.

Tamarind Tree Felled
Tauheed Khan murder case| तौहीद खान हत्या प्रकरणाचा मुद्दा विधिमंडळात; धनंजय मुंडेंकडून सखोल चौकशीची मागणी

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामात हे झाड अडथळा ठरत असल्याने ते तोडण्यात आले. मात्र या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून हे झाड वाचविण्याची चर्चा होत होती, पण अखेर कोणताही पर्याय न शोधता ते जमीनदोस्त करण्यात आले. ही चिंच केवळ एक झाड नव्हती. जुन्या बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या हजारो प्रवाशांची ती कायमची सोबती होती. उन्हाळ्यात कडक उन्हापासून तर पावसाळ्यात मुसळधार पावसापासून तिने असंख्य प्रवाशांना आश्रय दिला. तिच्या फांद्यांवर पक्ष्यांची घरटी होती, तर तिच्या सावलीत अनेक गप्पांचे फड रंगत असत. चाकूरकरांच्या आयुष्यातील अनेक सुख दुःखांची ती मुक साक्षीदार बनली होती.

झाड कोसळताना अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. "आमचे बालपण, तरुणपण आणि आयुष्याच्या असंख्य आठवणी या झाडाशी जोडलेल्या होत्या. आज त्या आठवणींचाही एक आधार हरपला," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रस्त्याच्या आराखडधात आवश्यक बदल करून हे ऐतिहासिक झाड वाचविणे शक्य होते. मात्र तसे न झाल्याने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिल्याची खंत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Tamarind Tree Felled
Electrocution death news : कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

आज चाकूरच्या जुन्या बसस्थानकावरून जाताना चिंचेची थंड सावली दिसणार नाही, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणार नाही. झाडे वाचवा, इतिहास वाचवा, अशी आर्त हाक आज चाकूरकरांच्या मनातून उमटत आहे. विकास आवश्यक आहेच; मात्र विकासासोबत निसर्ग आणि इतिहासाचे जतनही तितकेच महत्वाचे आहे, याची जाणीव करून देत चाकूरच्या ५० वर्षाच्या इतिहासाची साक्षीदार चिंच आता कायमची इतिहासजमा झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news