

गेवराई; पुढारी वृत्तसेवा
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने आज (मंगळवार) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास केली आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात नेहमीच कारवाई करत असून, या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी महसूलने पथकाची स्थापना केली आहे. या कार्यवाईमुळे वाळू माफियांमध्ये दहशत निर्माण झाली असून, त्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा हा सतत चालूच असतो. तो उपसा करुन या वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. राक्षसभुवन, सुरळेगाव येथे तर वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाईवरुन सिध्द होते. मागील आठवड्यातच सुरळेगाव या ठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह त्या ठिकाणी धाड टाकली होती. यावेळी एक हायवा व दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला होता. तरी देखील या कारवाईनंतरही या ठिकाणाहून होणारा वाळू उपसा सुरुच होता.
दरम्यान या कारवाईला आठ दिवसही उलटत नाहीत तोच आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास पुन्हा या ठिकाणी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने धाड टाकून अवैधरित्या वाळू भरुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे दोन हायवा पकडले. दोन्ही हायवांसह त्यामध्ये प्रत्येकी तीन ब्रास वाळू असा अंदाजे 25 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.
या कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या दोन्ही हायवा येथील तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत. ही कारवाई नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, अव्वल कारकुन नामदेव खेडकर, मंडळ अधिकारी परमेश्वर सानप, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, मंडळ अधिकारी खेडकर, तलाठी ठाकुर, सुरावार, ढाकणे, वाठोरे आदींनी केली.