बेळगाव; पुढारी वृत्तसेवा
महामेळाव्याच्या ठिकाणी घुसून कर्नाटक रक्षण वेदिकेच्या मूठभर गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासल्याची संतापजनक घटना काल (सोमवार) घडली होती. यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेध म्हणून आज (मंगळवार) बेळगाव बंदचा निर्णय मए समितीने जाहीर केला आहे.
दरम्यान, आज बेळगाव मध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला असून, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जी शाई फेक करण्यात आली. त्याचा तालुका म. ए. समिती व युवा म. ए. समिती तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, गोपाळराव देसाई, पांडुरंग सावंत, कीरण पाटील, भुपाळ पाटील, किशोर हेब्बाळकर, विलास बेडरे, मारूती गुरव आदी कार्यक्रर्ते राजा श्री शिवछत्रपती स्मारक आवारात ठाण मांडून बसले आहेत. या ठिकाणी निषेध सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. बेळगुंदीत आज स्वयंघोषित बंद पुकारून आज साखळी उपोषण करण्यात येत आहे. उचगावात सर्व व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.