बीड : ड्रोन शेती ठरणार कृषी महोत्सवाचे आकर्षण

बीड : ड्रोन शेती ठरणार कृषी महोत्सवाचे आकर्षण
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजी महाराज मल्टिपर्पज ग्राउंडवर पार पडणाऱ्या पाच दिवसीय बीड जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक ड्रोन शेतीचे तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक पाहावयाला मिळणार आहे. त्याचबरोबर बीडची विशेष खाद्य संस्कृतीला अनुभवण्यासाठी या महोत्सवात गावरान मेजवानीला तडका देण्याकरिता महिला बचतगटाचे स्टॉल सज्ज झाले आहेत.

शुक्रवार दि. २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, बीड जिल्हा कृषी महोत्सव पार पडणार आहे. बीड जिल्हा कृषी महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रम मंडपाचे आणि स्टॉलचे काम पूर्णत्वास आले आहे. या ऐतिहासिक बीड जिल्हा कृषी महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या शेती तंत्रज्ञानाला विज्ञानाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावण्याची गरज आहे. या महोत्सवात प्रगत शेतीच्या ज्ञान- तंत्रज्ञानासोबत अत्याधुनिक ड्रोन शेती यंत्राचे प्रात्यक्षिक तसेच ड्रोन शेतीचे महत्व, त्याचे फायदे या संदर्भात माहिती मिळणार आहे.

विविध विकसित शेती अवजारांसोबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. विशेष करुन बीडची अस्सल मराठमोळी गावरान जेवणाची चव देखील या महोत्सवात चाखायला मिळणार आहे. प्रथमच बीडच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा तडका बीडकरांना आणि इतर खवय्यांना अनुभवायला मिळणार असून बचतगटांच्या गावरान जेवणाची मेजवानी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. लोप पावत चाललेल्या खाद्यसंस्कृतीला पुनर्जीवित करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने याचे आयोजन केले आहे.

या कृषी प्रदर्शन,पशु प्रदर्शन,परिसंवाद, चर्चा सत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था, शेतकरी सन्मान समारंभ, अत्याधुनिक कृषी अवजारे प्रदर्शन, शेतकरी उत्पादक कंपनी व सेंद्रिय शेती गट उत्पादित धान्य, फळे, फुले, भाजीपाला हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरीकर, आत्माचे प्रकल्पसंचालक सुभाष साळवे यांनी केले आहे.

प्रदर्शनात जिभेला तृप्त करणारे पदार्थ

बीड जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीचे एक विशेष म्हणजे पुरणपोळी. कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी घराघरात बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला, तितका तो करायला कठीण. या संमेलनात पुरणपोळीसह, दही धपाटे, पिठलं- भाकरी, चुलीवरची जेवण इ. जिभेला तृप्त करणारे खाद्य पदार्थ प्रदर्शनाची विशेष मेजवानी आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news