

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : शेती खरेदीसाठी माहेरहून पन्नास हजार रूपये आणावेत, यावरून सासरी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गेवराई मर्दा ता.पैठण येथे मंगळवार (दि ३१) रोजी घडली. विवाहितीने आपल्या सात महिन्याच्या चिमुकलीस घरी सोडून विहिरीत उडी घेतली. सायमा कैसर सय्यद (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन बुधवारी (दि.१) दुपारी बारा वाजता पती कैसर रशीद सय्यद ,सासरा रशीद रसुल सय्यद, सासू फैय्युमनाबी सय्यद, दीर अनसार सय्यद,जाऊ फातेमा सय्यद,आणि नणंद परवीन सय्यद (सर्व रा.गेवराई मर्दा ता.पैठण) यांच्या विरुध्दात पाचोड ता.पैठण पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, माहेरकडील नातेवाईकांनी ही आत्महत्या नव्हे घातपात केल्याचा आरोप करत आरोपींविरुध्दांत जोपर्यंत खूनाचा गुन्हा दाखल होत नाही ,तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचा आक्रमक पविञा घेतला होता. त्यामुळे काही काळ पोलिस ठाण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, मयत सायमा हिचा भाऊ जब्बार गणी शेख वय (३०) रा.भाकरवाडी ता.बदनापूर यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की' कैसर सय्यद याच्या सोबत सायमाचा विवाह सन २०२० ला दीड लाख रुपये हुंडा देत मुस्लिम परंपरेनुसार करण्यात आला. सुरूवातीला सासरच्यांनी काही महिने चांगली वागणूक दिल्यानंतर शेती खरेदीसाठी माहेरहून पन्नास हजार रुपये घेऊन आणण्यासाठी सायमाच्या मागे सारखा तगादा सुरू केला होता. ही बाब तिने माहेरी आल्यानंतर घरच्यांना सांगितली होती. त्या कारणावरुन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती.
हा जाच असह्य झाल्याने सायमाने गट नंबर २७ मधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.दरम्यान पोलीसांनी पती सासरा नणंद यांना घटनेदिवशीच ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान बुधवारी सकाळी मयत सायमावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाकांच्या ताब्यात देऊन तब्बल सोहळा तासानंतर मयत सायमावर माहेरी शोकाकुल वातावरणात अंत्येविधी करण्यात आले.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी हे करीत आहे.
सासरच्या छळाला कंटाळून सायमाने आत्महत्या करण्यापूर्वी सात महिन्याच्या चिमुकलीस घरी सोडून विहिरीत उडी मारुन आपल्या जीवनाचा शेवट केला.त्यामुळे चिमुकली आईविना पोरकी झाली. तिच्या डोक्यावरील मायचे छञ कायमचे हरपल्याने या घटनेबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.