

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सतीश चव्हाण, आर.आर. पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
अभिजित देशमुख यांचा छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात एक वेगळा जनसंपर्क आहे. महाराष्ट्रभर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून विविध आंदोलने करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले, तरुणांचे मोठे संघटन कौशल्य त्यांच्याकडे असून शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, जिल्हा गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष पदी असताना त्यांनी नवरात्रोत्सव समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वेगळा जनसंपर्क निर्माण केला आहे. नगरसेवक असताना महानगरपालिकेत त्यांनी विविध विकासकामांसाठी सभागृहात महापौर तसेच प्रशासनाला धारेवर धरून शहरातील मूलभूत प्रश्न तसेच विकास कामे मार्गी लावले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांनी नेहमीच आर्थिक पाठबळ बँकेच्या माध्यमातून उभे करून दिले आहे. तर नुकत्याच झालेल्या छञपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन ते निवडून आले आहेत. शेतकरी, युवक तसेच सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची भावना कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची छञपती संभाजी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड केली आहे.
हेही वाचा