छत्रपती संभाजीनगरात घोटळ्याचा नवा ‘आदर्श’ : मानकापेने २०२ कोटी रुपये असे केले स्वाहा! | पुढारी

छत्रपती संभाजीनगरात घोटळ्याचा नवा 'आदर्श' : मानकापेने २०२ कोटी रुपये असे केले स्वाहा!

छत्रपती संभाजीनगर, गणेश खेडकर

 : येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने घोटाळ्याचा नवा आदर्श घालून दिला. २०१६ ते २०२२ या कालावधीत बँकेचे कर्मचारी, नातेवाईक आणि स्वत:च्या वेगवेगळ्या संस्थांना खिरापतीप्रमाणे विनातारण कर्जवाटप करून तब्बल २०२ कोटी रुपयांचा अपहार केल्यााप्रकरणी अध्यक्षांसह ५० जणांविरुद्ध सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. विनातारण, तारण कमी अन् कर्ज जास्त, कागदपत्रे अपूर्ण, असे प्रकार लेखापरीक्षण चाचणीत समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी गणेश मोकाशे याला चार कोटी १२ लाख ५ हजार ५९५ रुपयांचे आणि आदर्श महिला बँकेतील टायपिस्ट बबन भोसले याला चार कोटी ९ लाख १० हजार ६८१ रुपयांच्या कर्जाची खिरापत वाटल्याचे चाचणी लेखापरीक्षणातून समोर आले आहे. विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्हाण आणि सुधाकर गायके हे दोघे फिर्यादी आहेत. चव्हाण यांनी २०१६ ते १९ आणि गायके यांनी २०१८ ते २२ या कालावधीचे लेखापरीक्षण केले आहे. चव्हाण यांनी १०३ कोटी आणि गायके यांनी ९९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फिर्याद दिली आहे. सर्व शाखा आणि मुख्य शाखेत कर्जमागणीचे अर्ज येतात.

मुख्य कार्यालयातील कर्ज विभागाकडून त्यांची छाननी केली जाते. त्यानंतर पोटनियमातील तरतुदीनुसार पात्र असल्यास संस्थेच्या संचालक मंडळाने सभा घेऊन सर्वसमावेशक विचार करून मंजुरी दिल्यावर कर्जवितरण करणे बंधनकारक असते. मात्र,, चव्हाण यांनी केलेल्या २०१६ ते २०१९ वर्षांच्या चाचणी लेखापरीक्षणात पोटनियमातील तरतुदींचा भंग झाल्याचे आढळले. या कालावधीत आरोपींनी कट रचून २३ कर्जदारांना ९१ कोटी ७९ लाख ४४ हजार ६४ रुपयांचे विनातारण कॅश क्रेडिट कर्जवाटप केले. त्यांनी अपहार करण्याच्या उद्देशाने हा गैरव्यवहार केला. तसेच, सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

१०८ जणांना कर्ज वाटले, वसुली नाही

२०१६ ते १७ मध्ये चार कर्जदारांना ९५ लाखांचे कर्ज वाटप केले होते. ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत यातील ८० लाख ४९ हजार 329 रुपये थकबाकी आहे. तसेच, २०१७ ते १८ मध्ये १७ कर्जदारांना २ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटले. यातील २ कोटी ६६ लाख ३६ हजार ३८६ रुपये थकबाकी आहे. २०१८ ते १९ मध्ये ८७ कर्जदारांना ७ कोटी ६२ लाख २९ हजार ३१७ रुपयांचे कर्ज वाटले. यातील ७ कोटी ३७ लाख २६ हजार रुपये थकबाकी आहे. अपूर्ण अर्ज घेणे, कर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणाची पाहणी न करता पाहणी अहवाल देणे, पोटनियमांचे पालन न करणे, विनातारण व अल्प तारण घेऊन कर्ज वाटणे, वसुलीसाठी प्रयत्न न करणे आदी चुका केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. परिणामी ठेवी बुडीत निघण्याचा धोका निर्माण झाला आहे.

‘हे’ आहेत आरोपी

अध्यक्ष अंबादास मानकापे (रा. शिवज्योती कॉलनी, एन-६, सिडको) यांच्यासह महेंद्र जगदीश देशमुख, अशोक नारायण काकडे, काकासाहेब लिंबाजी काकडे, भाऊसाहेब मल्हारराव मोगल, त्रिंबक शेषराव पठाडे, रामसिंग मानसिंग जाधव, गणेश ताराचंद दौलनपुरे, ललिता रमेश मून, सपना संजय निर्मळ, अनिता अंबादास पाटील, प्रेमिलाबाई माणिकलाल जैस्वाल, मुख्य व्यवस्थापक देविदास सखाराम आधाने, पंडित बाजीराव कवटे, शाखाप्रमुख, कर्ज विभागप्रमुख, संबंधित कर्मचारी आदींसह ५० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

रामहरी तातेराव काकडे (३ कोटी ९५ लाख ४२ हजार ५५१), बबन नारायण भोसले (४ कोटी ९ लाख १० हजार ६८१ रुपये), रामेश्वर बाबुराव कचकुरे (२ कोटी ६४ लाख ५४ हजार ५९०रुपये), रत्नकला नबाजी कचकुरे (३ कोटी ८४ लाख ५४ हजार २२१), विलास मुरलीधर तांबे (२ कोटी ३९लाख ५८ हजार ६३५), नबाजी विठ्ठलराव कचकुरे (२ कोटी २५ लाख ६७ हजार ६६४), शहा कादर अमर शहा (४ कोटी ३३ लाख ५७हजार ४१ रुपये), बद्रीनाथ दादाराव कचकुरे (३ कोटी २२ लाख ९४ हजार ११६), नबाजी विठ्ठलराव कचकुरे (१ कोटी ९२ लाख ५० हजार २४९), नामदेव दादाराव कचकुरे (२ कोटी ३८ लाख ९५ हजार १५१), नारायण दादाराव कचकुरे (३ कोटी २५ लाख ४६ हजार ६२७), हरीभाऊ विठ्ठलराव कचकुरे (३ कोटी २५ लाख ४७ हजार ९३३), दौलत विठ्ठलराव कचकुरे (२ कोटी ५१ लाख ९२ हजार ६३२), गणेश अरुण मोकाशे (४ कोटी १२ लाख ५ हजार ९९५)

आदर्श समूहाला ५४ कोटी ८६ लाखांचे कर्ज

आदर्श अप्रतिम गावकरी (१० कोटी 75 लाख 23 हजार 193), आदर्श जनकल्याण प्रतिष्ठान प्रा. लि. सहकर्जदार साई सन्स अँड कंपनी (२० लाख १७ हजार ३६ रुपये आणि ४ कोटी ८२ लाख ६० हजार १५६ रुपये), आदर्श जनकल्याण प्रतिष्ठान (१ लाख ५४ हजार ३३९), जयकिसान जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था म., करमाड (१६ कोटी ५४ लाख ८१ हजार १२७), आदर्श बिल्डर अँड डेव्हलपर्स (७ कोटी १७ लाख ९० हजार), औरंगाबाद जिल्हा कृषी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था (१ कोटी ७ लाख ९५ हजार ९४३), आदर्श सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (६४ लाख ७८ हजार ८२ रुपये), आदर्श डेअरी प्रोडक्ट प्रा. लि. (६ कोटी ३२ हजार ६६ हजार १०२), आदर्श मल्टिमीडिया प्रा. लि. (७ कोटी २८ लाख ४६ हजार ५१५)

एक कर्जदार दुसऱ्याचा जामीनदार

ज्या २४ कर्जदारांना अगदी खिरापतीप्रमाणे कर्जाचे वाटप केले, त्यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रत्येक कर्जदाराला जामीनदार द्यावा लागतो. येथे मात्र, एक कर्जदार दुसऱ्याचा जामीनदार असल्याचे लेखापरीक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे अनेक कर्जदार हे अनेकांना जामीनदार असल्याचे दिसते.

हेही वाचलंत का?

Back to top button