जालना जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव | पुढारी

जालना जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव

जालना; विजय सोनवणे : जालना जिल्ह्यात विषेश करून शहरात नवीन वर्षांपासून दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत भर पडत आहे. त्यात रविवारी कोरोनाचे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये जालना शहरातील २५ आहेत. याशिवाय जिल्ह्यात पहिला ओमायक्रॉन रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ओमायक्रॉनचा रूग्ण दुबई येथून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी रात्री उशीरा दिली आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. शनिवारी २३ आणि रविवारी ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धोक्याची घंटा वाटत आहे.

फेब्रुवारी ते जूनदरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली होती. या कालावधीत हजारो पॉझिटिव्ह रुग्णामध्ये शेकडो नागरिकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोना संसर्ग कमी झाला. डिसेंबर महिन्यात अत्यंत कमी कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. चार महिन्यांत दुहेरी आकड्यामध्ये संक्रमितांची संख्या नोंद झालेली नव्हती. आता मात्र, डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा संक्रमण वाढायला लागले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा या आठवड्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

याशिवाय काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आलेले आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी कुठेही होत नाही व याबाबत जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील नगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे बोलले जात आहे.

मागच्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धोकादायक कोरोना व्हायरस कधी संपेल, याची खात्री नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दोन दिवसांत ६० पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

त्यामुळे रविवारी (दि.९) जिल्ह्यात कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या १३१ झाली होती. त्यात रविवारी जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रूग्ण एक जानेवारी रोजी दुबई येथून शहरात आला होता. त्यांनतर २ जानेवारी रोजी या रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मात्र, त्याला कोणताही त्रास नव्हता. सदर रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे आरोग्य यंत्रणेला सांगितले. मात्र, तो रूग्ण रूग्णालय दाखल न होता होम क्वारंटाईन झाला. दुबई येथून आल्याने व कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णांचे नमुने ओमायक्रॉन विषाणू चाचणीसाठी पाठविले होते.

त्याचा अहवाल रविवारी (दि.९) प्राप्त झाला असून त्या रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकर यांनी सांगितले. त्यामुळे तो रुग्ण आता होम क्वारंटाईन असल्याने तो किती जणांच्या संपर्कात आला आहे. याची माहिती आरोग्य विभाग संकलित करत आहे, अशी माहिती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.

Back to top button