गंगाखेड शुगर : ईडीचा दणका; ३९ हेक्टर जमीन केली सील | पुढारी

गंगाखेड शुगर : ईडीचा दणका; ३९ हेक्टर जमीन केली सील

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी व खापरखेडा शेतशिवारात गंगाखेड शुगर ॲन्ड एजन्सी लिमिटेड विजयनगर माखणीतर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावाने असलेली ३९.३७ हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ४ जानेवारी रोजी सील केली. यासाठी तहसीलच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सोबत घेत ही कारवाई करण्यात आली.

ईडीचे अधिकारी मंगळवारी (दि. ४) तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. वाकोडी, खापरखेडा येथील जमीन सील करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी  मंडळ अधिकारी व तलाठी यांना सोबत घेऊन ते वाकोडी व खापरखेडा शिवारात गेले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी या पथकाला गंगाखेड शुगर अँड एजन्सी लिमिटेड विजय नगर माखणीतर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा (रा. उमरखेड) यांच्या नावे असलेली जमीन दाखविली. वाकोडी व खापरखेडा येथे जाऊन या अधिकाऱ्यांनी जमिनीला सील लावले. तसे फलकही उभे केले. गंगाखेड शुगर अँड एजन्सीची वाकोडी येथील सर्वे क्रमांक ९८ मधील १०.७३ हेक्टर, सर्वे क्रमांक ८६ मधील २.८४ हेक्टर, सर्वे क्रमांक ८७ मध्ये ७.९९ हेक्टर व खापरखेडा येथील सर्वे क्रमांक १४२ मधील १४ हेक्टर, सर्वे क्रमांक १३७ मधील ३.८० हेक्टर जमीन आहे. ( गंगाखेड शुगर )

वाकोडी शिवारातील २१.५७ हेक्टर व खापरखेडा शिवारातील १७.८० हेक्टर अशी एकूण ३९.३७ हेक्टर जमीन आहे. ही जमीन ईडीच्या पथकाने सील केल्याचा फलकही लावण्यात आलेला आहे. ईडीच्या पथकासोबत मंडळ अधिकारी किरण पावडे, तलाठी गंगाधर पाखरे, रेवता लुटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ईडीचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी वाकोडी व खापरखेडा येथील काही सर्व गटांमधील जमीन दाखविण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना आमच्यासोबत पाठवा, असे सांगितले. त्यानुसार मी मंडळ अधिकारी व दोन तलाठ्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाठविले. त्यांनी वाकोडी व खापरखेडा येथे जाऊन त्या सर्व्हे क्रमांकाच्या जागेचा पंचनामा करीत जागा ताब्यात घेतली. त्या जागेवर त्यांचा फलक लावला आहे.

-तहसीलदार सुरेखा नांदे

Back to top button