बीड : अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू; प्रेत ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार | पुढारी

बीड : अवैध वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू; प्रेत ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार

गेवराई, पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खामगाव शिवारातून ट्रॅक्टरव्दारे अनधिकृत वाळू उपसा करून त्याची तस्करी केली जाते. रात्री वाळूची तस्करी करणाऱ्या टॅक्टरने एकाला जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तुकाराम बाबूराव निंबाळकर (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्तापर्यंतच्या वाळू तस्करीत हा नऊवा बळी असल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील खामगाव येथील तुकाराम निंबाळकर हे आपल्या दुचाकीवरुन (एम.एच.23ए.ए.8126) गेवराईकडे येत असतांना अनाधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये निंबाळकर यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. तर घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

दुपारी एक वाजल्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांनी ठिय्या मांडला आहे. या ठिय्यामध्ये मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, भाजपचे युवा नेते शिवराज पवार, दादासाहेब गिरी, योगेश मोटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

ट्रॅक्टर च्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देवू असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्यानंतर प्रेत ताब्यात घेण्यात आले.

खामगाव येथून ट्रॅक्टर घेतला ताब्यात

अपघातानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पलायन केले होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर पोलीसांनी सदर ट्रॅक्टर खामगाव येथून ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

याबाबत प्रशासन काही ठोस उपाययोजना करणार की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत विनंती केल्याने आंदोलन थांबवण्यात आले, अशी  माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

 

हेही वाचलं का? 

Back to top button