Ashok Chavan on Congress : अशोक चव्हाणांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन पंतप्रधान पाळतील का?: कॉंग्रेसचा सवाल | पुढारी

Ashok Chavan on Congress : अशोक चव्हाणांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन पंतप्रधान पाळतील का?: कॉंग्रेसचा सवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन पंतप्रधान पाळतील का? असा सवाल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. शनिवारी ( दि. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी येथे प्रचारसभा संपन्न झाली. याच सभेच्या अनुषंगाने काँग्रेसने एक्सवर पोस्ट लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले. Ashok Chavan on Congress

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. पंतप्रधानांनी नांदेड आणि परभणी या दोन ठिकाणी प्रचारसभांना संबोधित केले. या प्रचारसभेत खा. अशोक चव्हाणही मंचावर उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना लगेच भाजपने राज्यसभेवर पाठवले. याच गोष्टीवरुन निशाणा साधताना काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना एक्सवर पोस्ट लिहून तीन प्रश्न विचारले. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचे दिगग्ज नेते राहिलेल्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला, ही गोष्ट काँग्रेस स्वीकारत आहेत की काय असा सवालही उपस्थित होतो. Ashok Chavan on Congress

जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, “पंतप्रधानांनी ३० मार्च २०१४ मध्ये नांदेडमध्ये दिलेल्या भाषणात अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान झालो तर अशोक चव्हाण यांना सहा महिन्यांत तुरुंगात पाठवू, असे मोदी म्हणाले होते. एका दशकानंतरही चव्हाण तुरुंगात नाहीत, चौकशी सुरू आहे आणि ते केवळ भाजपचे उमेदवारच नाहीत तर भाजपचे राज्यसभेचे खासदारही आहेत. पंतप्रधान मोदीही भाजपला निर्लज्ज मानतात का? चव्हाण यांना लवकरच क्लीन चिट देण्याचा कट रचणार का? भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याचे आश्वासन ते पूर्ण करणार का?” याबरोबरच मराठवाड्यातील पाण्याची समस्या आणि नांदेड विभागातील रेल्वेची वाईट अवस्था यावरुनही जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा 

Back to top button