परभणी, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विभाजनास कारणीभूत असलेली काँग्रेस ही अशी वेल आहे. जिला ना बुड ना शेंडा आहे, तिच्या सोबत जे येतात त्यांनाच सुकवून टाकण्याचे काम ती करते. काँग्रेसने मराठवाडयाला विकासापासून कोसोदूर ठेवले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.२०) येथील जाहीर सभेत केला. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ लक्ष्मी नगरात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. (Loksabha Election)
ते म्हणाले की, महाविकास आघाडीने मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील सिंचनाचे प्रश्न प्रलंबित ठेवले. प्रामुख्याने जलयुक्त शिवार व वॉटर ग्रीड या सिंचनाच्या प्रमुख प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले. मात्र, आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघे प्रकल्पांना मार्गी लावण्याचे काम निश्चित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रामुख्याने कोरोना काळात 9 लाख जनतेला लस देण्यात आली. 12 लाख लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. 17 जनऔषधी केंद्रांतून 80 टक्के सवलतीत औषधी मिळत आहे. 40 हजार लोकांना या जिल्हयात पक्के घरे देण्याचे काम करताना केंद्र सरकारने यात कोणतीही जात, पंथ पाहिला नाही. सब का साथ, सबका विकास याच धोरणावर सरकारने काम केले आहे. देशाला जगाची तिसरी अर्थव्यवस्था करण्याचे काम पुढील पाच वर्षात केले जाणार आहे. चांद्रयान यशस्वी झाले. आता गगनयानाची फलश्रुती पाहावयाची आहे. (Loksabha Election)
मराठवाडयातील लोअर दुधना प्रकल्पाला केंद्राने निधी दिला आहे. आता सोयाबीन तेलबियांचा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येईल. ज्यामुळे मराठवाडयातील सोयाबीन उत्पादक शेतकर्याला चांगला भाव मिळू शकेल. मराठवाडयातील रेल्वेचे प्रश्न पूर्ण करण्याचा संकल्पही आपण संकल्प पत्रातून दिला असल्याचे मोदी म्हणाले.
एनडीए आघाडीने आपल्या संकल्प पत्रात देशाच्या प्रत्येक भागाच्या विकासाच्या दृष्टीने मुद्दे मांडले असून त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे परभणीच्या विकासासाठी महादेव जानकर या छोटया भावाला आपण निवडणूक रिंगणात उतरविले आहे. जनतेने त्यांना साथ देवून आपला प्रणाम प्रत्येक घरा-घरापर्यंत पोहचून ज्येष्ठांचा आशिर्वाद द्यावा. तीच आपली ऊर्जा असल्याचे मोदी म्हणाले.
हेही वाचा :