Hingoli News : मोंढ्यात हळद उत्पादकांचे हाल: उपाशीपोटी लिलावाची प्रतीक्षा | पुढारी

Hingoli News : मोंढ्यात हळद उत्पादकांचे हाल: उपाशीपोटी लिलावाची प्रतीक्षा

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा:  सांगलीनंतर हिंगोलीचा मोंढा हळदीसाठी प्रसिद्ध आहे. मागील पंधरवाड्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ळदीची विक्रमी आवक होत आहे. मंगळवारी तब्बल 25 हजार क्‍विंटल हळदीची आवक झाली. परंतू सातत्याने शासकीय सुट्टया येत असल्याने मोंढा बंद राहत असल्याने शेतकर्‍यांच्या मालाचे वजन करण्यासाठी चार दिवस मोंढ्यातच मुक्‍काम करावा लागत आहे. मंगळवारी ढगाळ वातावरण असल्याने आपली हळद भिजू नये, यासाठी शेतकर्‍यांना पदरमोड करून मेनकापड खरेदी करून वाहनावर झाकावे लागले. Hingoli News

मागील दहा वर्षानंतर यंदा प्रथमच हळदीला 13 ते 15 हजार रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. परंतु वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या हळदीच्या पिकाला येथील मोंढ्यात विक्रीसाठी आणल्यानंतर शेतकर्‍यांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. साधे पाणी देखील मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. मागील दोन दिवसांपासून मोंढ्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. बुधवारी रामनवमी असल्याने मोंढा बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना किमान चार ते पाच दिवस मोंढ्यातच मुक्‍काम करावा लागणार आहे. Hingoli News

जवळपास 25 हजार क्‍विंटल हळदीचा काटा करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आपल्या हळदीच्या राखणीसाठी शेतकर्‍यांना पदरमोड करून रात्रीच्या अंधारात झोपावे लागत आहे. बाजार समिती प्रशासनाकडून नियोजन केले जात नसल्याने शेतकर्‍यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. चार दिवस मुक्‍काम पडल्यास गाडीचे भाडे शेतकर्‍यांच्या माथी पडत आहे. परिणामी हळदीला जरी समाधानकारक दर मिळत असला तरी त्यातील 25 टक्के खर्च हा मुक्‍काम व भाड्यासाठीच करावा लागत आहे. जेवण व इतर खर्च वेगळाच होत असल्याने शेतकर्‍यांच्या हातावर प्रतिक्‍विंटल 10 हजार रूपयेच पडत असल्याचे चित्र आहे.

Hingoli News  शेतकर्‍यांची उडाली धांदल

सोमवारपासून येथील मोंढ्यात हळदीची विक्रमी आवक होत आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास आकाशात ढगाने गर्दी केल्याने वाहन झाकण्यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांना दोन ते तीन हजार रूपयांचे मेनकापड खरेदी करावे लागले. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे मोंढ्यातील सर्वच वाहने मेनकापडाने झाकण्यात आल्याचे दिसून आले.

उपाशीपोटी लिलावाची प्रतीक्षा

मागील पंधरवाड्यापासून हळद विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी आपली हळद घेऊन येत आहेत. परंतु मोंढ्यात चार-चार दिवस काटा होत नसल्याने शेतकर्‍यांना जेवणाची चिंता भेडसावत आहे. आडत्याकडून उचल घेऊन दोन वेळच्या जेवण्याची तजवीज करावी लागत आहे. अनेक शेतकर्‍यांना तर उपाशीपोटी राहून लिलावाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. बाजार समितीचे कोट्यावधीचे उत्पन्न असतानाही शेतकर्‍यांना निवास, भोजनाची व्यवस्था केली जात नसल्याने रोष व्यक्‍त होऊ लागला आहे.

संचालक मंडळ व्यापारी धार्जीणे

शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून बाजार समितीवर दर पाच वर्षाने संचालक मंडळ नेमण्यात येते. संचालक मंडळातून सभापती व उपसभापतींची निवडही करण्यात येते. परंतू संचालक मंडळाकडून शेतकर्‍यांची बाजू घेण्याऐवजी नेहमीच व्यापार्‍यांची बाजू घेतली जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून घेतला जातो. सध्या शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतू लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकर्‍यांकडे लक्ष देण्यास संचालकांना वेळ नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून विद्यमान संचालकांबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त होऊ लागली आहे.

हेही वाचा 

Back to top button