Hingoli Lok Sabha : ज्येष्ठ महिलेच्या मताधिकारासाठी झोपडीत उभारले मतदान केंद्र | पुढारी

Hingoli Lok Sabha : ज्येष्ठ महिलेच्या मताधिकारासाठी झोपडीत उभारले मतदान केंद्र

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा :  कळमनुरी तालुक्यातील बोथी शिवारातील 85 वर्षीय जेष्ठ महिलेच्या मतदानासाठी मतदान कर्मचार्‍यांनी रविवारी 3 किलोमीटर पायी जात  महिलेच्या झोपडीमध्ये तात्पुरते मतदान केंद्र उभारले. आणि  तिचे मतदान करून घेतले. मतदान केल्यानंतर महिलेच्या चेहर्‍यावरही समाधानाचे भाव दिसून आले. Hingoli Lok Sabha

हिंगोली लोकसभा मतदार संघात यावर्षी 75 टक्के पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना टपाली मतपत्रिका दिल्या जाणार असून 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांग व 85 वर्षपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कळमनुरी विधानसभा मतदार संंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ  नागरिक व दिव्यांगांच्या मतदानासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून त्या त्या भागात जाऊन मतदारांचे मतदान करून घेतले जात आहे. Hingoli Lok Sabha

कळमनुरी तालुक्यातील बोथी शिवारात गावापासून तीन किलो मीटर अंतरावर रंगुबाई देवराव खंदारे व त्यांची बहिण शेतातील आखाड्यावर राहतात. रंगुबाई यांचे वय ८५ वर्षापेक्षा अधिक असल्यामुळे मंडळ अधिकारी रेवता लुटे, तलाठी एकनाथ कदम, गणेश माखणे, विमल टेकाम, सुक्ष्म निरीक्षक किरण हुंबे, पोलिस कर्मचारी सरकटे, पोलिस पाटील विजय भिसे यांचे पथक रविवारी दुपारी बोथी येथे गेले. त्यानंतर पथकाने गावापासून तीन किलो मीटर अंतरावर पायी जाऊन त्यांचा आखाडा गाठला.

त्याठिकाणी झोपडीतच तात्पुरते मतदान केंद्र उभारले. यावेळी कर्मचार्‍यांनी रंगुबाई यांना मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीतील उमेदवार व त्यांची निवडणूक निशाणी समजावून सांगितली. अन् कर्मचारी बाजूला झाले. त्यानंतर रंगुबाई यांनी मतदान करून त्यांची मतपत्रिका पाकीटबंद करून मतपेटीत टाकली. वयामुळे मला मतदानाला येता आले नसते. पण घरी येऊनच मतदान करून घेतल्याने मतदानाचा हक्क बजावता आला, असे रंगुबाई यांनी सांगितले. मतदानानंतर त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसून आले.

हेही वाचा 

Back to top button