वेध लोकसभेचे : १९८० च्या निवडणुकीनंतर चव्हाण, चाकूरकर केंद्रात | पुढारी

वेध लोकसभेचे : १९८० च्या निवडणुकीनंतर चव्हाण, चाकूरकर केंद्रात

उमेश काळे

जनता पक्षाला मोठ्या अपेक्षेने जनतेने निवडून दिले होते. पण अंतर्गत मतभेद, नेत्यांची स्पर्धा, द्विसदस्यत्वाचा वाद आदी कारणांमुळे मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंह हे पंतप्रधानपदी फार काळ राहू शकले नाहीत. चरणसिंह तर विश्वासमताला सामोरे न जाता पंतप्रधानपदावरून पायउतार झाले. मराठवाड्याच्या दृष्टीने चरणसिंहांनी फायदा एवढाच केला की, धाराशिवचे खा. तुकाराम शृंगारे यांना दळणवळण राज्यमंत्री केले होते. मराठवाड्याला केंद्रात प्रथमच प्रतिनिधीत्व मिळाले होते.

१९८० च्या निवडणुका जाहीर झाल्या अन् त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. जनता पक्षाच्या विरोधात जनमत तयार झाले आणि विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला. त्यात डॉ. बापू काळदाते, पुंडलिकराव दानवे, केशवराव धोंडगे, उद्धवराव पाटील यांचा समावेश होता. बीडमधून बुरांडे अप्पा आणि हिंगोलीचे चंद्रकांत पाटील निवडणुकीला उभे नव्हते. बापू काळदातेंनी संभाजीनगरऐवजी हिंगोलीत उभे राहण्याचे ठरविले, परंतु तेथे त्यांचा दणदणीत पराभव झाला.

शंकरराव चव्हाण विजयी

या निवडणुकीत पहिल्यांदाच उभे असणारे मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण हे विजयी झाले. त्यांनी केशवरावांचा ३७ हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीपूर्वी बरेच पाणी वाहून गेले होते. २१ फेब्रुवारी, १९७५ ते १९७७ या काळात त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद होते. पुलोदचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस स्थापन करून पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. परंतु दोनच वर्षात पक्ष विसर्जित करून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इंदिराजींना त्यांना नांदेडमधून उमेदवारी दिली. राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिपदाचा अनुभव पाहून इंदिराजींना त्यांना प्रारंभी शिक्षणमंत्री केले. त्यानंतर संरक्षण, मनुष्यबळ विकास, परराष्ट्र, नियोजन आयोग उपाध्यक्ष, अर्थ व नरसिंहरावांच्या काळात गृहमंत्रीपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. दरम्यान १९८६ ते ८८ या काळात राज्याचे मुख्यमंत्रीही होते.

जनतेच्या कामासाठी … 

पुलोद सरकारमध्ये शंकरराव चव्हाण सहभागी झाले, यामागे काही कारणे सांगितली जातात. कारण माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता सरकारात मंत्री होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना होती. मंत्रीपदावर राहिल्यानंतर जनतेची कामे करता येतात, अशी भावना त्यांनी एका मुलाखतीत व्यक्‍त केली होती. शंकररावांचा हा निर्णय चुकला असता तर कदाचित त्यांना पुढे केंद्रात स्थान मिळाले असते किंवा नाही याबद्दल शंका व्यक्‍त केल्या जातात. चव्हाणांनंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस हे पाच माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून राहिले.

चाकुरकरांचे योगदान

या निवडणुकीत लातुरातून निवडून गेलेल्या शिवराज पाटील चाकुरकरांकडे इंदिराजींनी संरक्षण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर वाणिज्य मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, स्पेस आणि ओशन डेव्हलपमेंट, नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन, गृह तसेच लोकसभाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल म्हणून चाकूरकर कार्यरत होते. या निवडणुकीने मराठवाड्यातील दोन नेत्यांना केंद्रात प्रदीर्घकाळ राजकारण करण्याची संधी मिळाली, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे.

Back to top button