Milk Subsidy | दुष्काळात तेरावा ! दूध अनुदानाचे घोडं नेमकं अडलं कुठं? बळीराजा संतप्त

Milk Subsidy | दुष्काळात तेरावा ! दूध अनुदानाचे घोडं नेमकं अडलं कुठं? बळीराजा संतप्त
Published on
Updated on

आष्टी; पुढारी वृत्तसेवा: राज्यात बहुतांश भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाकडे पाहत आहे. परंतु, दुधाचे पडलेले भाव यामुळे बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. Milk Subsidy

राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधीकरिता दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. पण अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला. तरी दूध उत्पादक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, या विवंचनेत दूध उत्पादक शेतकरी आहेत. Milk Subsidy

राज्य शासनाने जाहीर केलेल्या दूध अनुदान वाटपाचा एक महिन्याचा कालावधी संपला असून, ११ फेब्रुवारीपासून परत गायीच्या दुधाचा दर ३.५ फॅटसाठी २७ रुपये झाला आहे. काही संस्थांनी दुधाचा दर २६ रुपयांपर्यंत खाली आणला आहे. त्यामुळे दूध अनुदान वाटप शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरले आहे. अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्‍न 'जैसे थे' च राहिला आहे.

Milk Subsidy अनुदान कालावधी वाढवण्याची मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, शिवाय दुधाला नैसर्गिकरीत्या दरात वाढ मिळत नाही. तोपर्यंत दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.अगोदरच वैरण आणि पशुखाद्यावरील खर्चात मोठी वाढ झाली असल्याने दूध व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनुदान कालावधी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांचे दूध व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

म्हशीच्या दूध दरात घसरण

गायीच्या दूध दराचा प्रश्न मिटला नसताना, म्हशीचा दूध दरात १ फेब्रुवारीपासून एक रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे म्हशीच्या दूध दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपला आहे. नव्याने अनुदान वाटपाचा कालावधी वाढवायला हवा, असे दूध संस्थांचे मत आहे. शासनाकडून आमच्या संघाला दूध अनुदान केव्हा मिळणार आहे किंवा अनुदान वाटप कालावधी वाढेल का, याबाबत कोणत्याही सूचना आल्या नाहीत.

– चेअरमन भगवान शिंदे, दूध संकलन केंद्र, शेरी बुद्रूक

जोपर्यंत दुधाला नैसर्गिकरीत्या दर मिळत नाही, तोपर्यंत राज्य शासनाने दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवायला हवा. शिवाय जाहीर केलेले अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे. नाहीतर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारले जाईल.

– प्रा. ज्ञानदेव थोरवे, शिवसंग्राम, जिल्हा सरचिटणीस बीड

शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान अजून मिळाले नाही. दूध अनुदान वाटपाचा कालावधी संपल्याने २५ ते २६ रुपयाने दूध दर मिळत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकरात लवकर दूध अनुदान जमा करावे व दूध अनुदान वाटपाचा कालावधी वाढवावा.

-राहुल गोरे, दूध उत्पादक शेतकरी, शेरी बुद्रूक

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news