वेध लोकसभेचे – पुंडलिकराव दानवे : उमेदवारी जाहीर झाली तेव्हा खिशात होते सात रुपये

Pundalikrao Danve
Pundalikrao Danve
Published on
Updated on

आता साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची म्हटली तरी लाखोंची सौदेबाजी होते. तेथे खासदार, आमदार निवडणुकीचा खर्च किती होत असावा याचा अंदाजच न केलेला बरा. पण १९७७ ला देशात इंदिरा विरोधी लाट असताना जालना लोकसभा मतदारसंघातून जनता पक्षाचे उमेदवार पुंडलिक हरी दानवे हे निवडून आले. त्यांना पक्षाने जेव्हा उमेदवारी घोषित केली. तेव्हा त्यांच्या खिशात अवघे सात रुपये होते. परंतु जनसंपर्क, प्रामाणिक नेता अशी प्रतिमा असणार्‍या पुंडलिकरावांना मतदारांनी लोकसभेत पाठविले. या निवडणुकीत दानवे यांनी काँग्रेसचे नेते माणिकराव पालोदकर यांचा पराभव केला होता. मी जन्मजात पीएच. डी. आहे. कारण, माझे नाव Punlik Hari Danve आहे, असे ते म्हणत.

सरंपचापासून प्रवास

तसे पुंडलिकराव हे भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथील रहिवासी. ग्रामपंचायत सरपंच, सोसायटीचे चेअरमन अशी पदे त्यांनी भूषविली होती. जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते. १९६७ ला जनसंघाचा दिवा घरोघरी लावा, अशा घोषणा देत ते विधानसभेला उभे होते. त्यावेळी त्या निवडणुकीचा खर्च झाला होता ६० रूपये. विधानसभा पंधराशे मतांनी ते पराभूत झाले. त्यानंतर १९७२ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. आणीबाणीत ते काही काळ कारागृहात होते. तेव्हा स्थापन झालेल्या जनता पक्षात जनसंघ हा घटक पक्ष होता. जालन्याची जागा ही जनसंघाकडे आली. नेते आणि कार्यकर्त्यांची वाणवा असलेल्या या जिल्ह्यात पुंडलिकरावांच्या रूपाने नेतृत्व उभे राहिले. १९७७ च्या निवडणुकीत कधी बैलगाडी तर कधी पायी प्रवास करीत ते प्रचार करीत.

गावातील दोन कार्यकर्त्यांना अगोदर निरोप दिला जात असे. इंदिरा सरकार असल्याने लोकांमध्ये आणीबाणीची भीती होती. पण असंतोष खदखदत होता. जालना येथे मामा चौकात जनता पक्षाच्या नेत्या मृणाल गोरे यांची सभा झाली. या सभेत पुंडलिकरावांनी 'मुझे व्होट भी दोन और नोट भी दो 'असे आवाहन केल्यानंतर २५ हजार रूपये जमा झाले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माणिकराव पालोदकर यांचा २४ हजार ५७४ मतांन पराभव केला होता. लोकसभा सदस्यत्वाची शपथ त्यांनी संस्कृतमधून घेतली. याबद्दल त्यांचा राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते गौवरही झाला होता. जनता पक्ष अडीच वर्ष सतेवर राहिल्यानंतर झालेल्या निवडणुकीत मात्र ते पराभूत झाले.

१९८९ ला पुन्हा खासदार

भाजप शिवसेना युतीची लाट असताना १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले. काँग्रेस नेते बाळासाहेब पवार हे 61 हजार मतांनी पराभूत झाले. त्यावेळी अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे दोन वर्षानंतर १९९१ ला निवडणूक झाली. १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अंकुशराव टोपे निवडून आले. १९९६ ला पुंडलिकरावांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण भाजपने छत्रपती संभाजीनगर येथील उद्योगपती उतमसिंह पवार यांना तिकिट दिले. तेव्हा पक्षातील कार्यकर्त्यांनी जालन्यात बंड पुकारले. संघ आणि भाजप कार्यकर्त्यांनी पुंडलिकरावांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. हे बंड शमविण्यासाठी खास गोपीनाथराव मुंडे यांना जालन्यात यावे लागले. त्यानंतर पुंडलिकराव सक्रिय राजकारणातून दूर गेले.

आपण काय म्हतारे झालोत का? शरद पवार

पुंडलिकरावांची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झाली. कालांतराने ते जनसंघ, भाजपमध्ये सक्रिय झाले. भापजशी दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार भोकरदनला आले. आपले वय झाल्याची टीका केली जाते, याचा संदर्भ देत शरद पवार यांनी व्यासपीठावरील पुंडलिकरावांना जवळ बोलाविले आणि विचारले,पुंडलिकराव आपण म्हतारे झाले आहोत का? तेव्हा पुंडलिकराव म्हणाले…नाही..नाही..आपण आदेश दिला तर मी लोकसभा रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढविल. ही गुरू शिष्याची नाही तर राम-रावणाची लढाई ठरेल, असे ते म्हणाले. या सभेत पुंडलिकरावांचे भाषण एवढे दमदार झाले की, पवारांचे भाषण ऐकण्यासाठी लोक थांबायलाही तयार नव्हते. चंद्रकांत दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून गेले. दुसरे चिरंजीव सुधाकरराव दानवे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात सक्रिय आहेत.

गुप्‍त हालचाली कळवित

पुंडलिकरावांचे व्यक्‍तिमत्व साधे होते. जनता पक्षाच्या काळात व्दिसदस्यत्वाचा मुद्दा अनेक सदस्यांनी लावून धरल्यानंतर जनता पक्षातील समाजवादी मंडळींच्या बैठका होत. त्यात पुंडलिकराव जात. त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत असे की ते आपल्याच पक्षाचे खासदार आहेत. प्रत्यक्षात पुंडलिकराव होते जनसंघाशी संबंधित. त्यामुळे अंतर्गत घडामोडी ते अटलजींना कळवित असत. पुंडलिकराव हे इतके तत्वनिष्ठ होते, की दोन्ही वेळा लोकसभा विसर्जित झाल्यानंतर खासदारांना मिळणारा रेल्वे सवलतीचा पास त्यांनी दिल्‍लीत जमा करून जनरल डब्यात प्रवास करून जालना गाठले. १ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दुर्देव म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या चार दिवस अगोदरच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news