

माहूर: पुढारी वृत्तसेवा : विवाह सोहळ्यासाठी जात असताना उभ्या टिप्परला पाठीमागून दुचाकीची जोराची धडक बसली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.५ ) रात्री पावणेदहाच्या सुमारास माहूर तालुक्यातील गोंडवडसा जवळ घडली. विशाल शंकर मंतेरवार (वय २३, रा.तरोड), असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहूर तालुक्यातील अंजनखेड येथे आज (दि. ६) लग्नसोहळा होता. यासाठी घाटंजी तालुक्यातील विशाल शंकर मंतेरवार व संतोष पेटकुले (वय ३५) (रा. दातोडी) हे दोघे मंगळवारी रात्री दुचाकीवरून (एम.एच. ३१ सी.१९९०) जात होते.
दरम्यान, रात्री ९ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास सारखणीकडून अंजनखेडकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील गोंडवडसा (ता. माहूर) फाट्याजवळ उभा असलेला टिप्पर (ए.पी. २६ टी.सी. २२५२) ला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली.
यात विशाल मंतेरवार याच्या डोक्याचा 'चेंदामेंदा' झाल्याने ते जागीच ठार झाला. तर संतोष पेटकुलेला हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
हेही वाचा