वेध लोकसभेचे : सातार्‍याचे क्रांतिसिंह झाले बीडचे खासदार | पुढारी

वेध लोकसभेचे : सातार्‍याचे क्रांतिसिंह झाले बीडचे खासदार

उमेश काळे

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरूद्ध सातारा, सांगली भागात क्रांतिकारी काम करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नानासाहेब पाटील हे बीड जिल्ह्याचे खासदार होते. या भागातील 1500 गावांमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या पत्रिसरकारचा प्रभाव होता. सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षात काम करणारे नानासाहेब यांनी नंतर शेकाप व कालांतरांने भाकपमध्ये प्रवेश केला. 1957 ची निवडणूक ते सातार्‍यातून तर 1967 ला भाकपने त्यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी दिली. वास्तविक ते सातार्‍यातून निवडणुकीची तयारी करीत होते, पण त्यांना पक्षाने बीडमध्ये उभे राहण्यास सांगितले. पक्षादेश मान्य करीत त्यांनी बीडकडे कूच केली व खासदार म्हणून उल्‍लेखनीय काम केले. मराठीत भाषण करणारे पहिले खासदार अशी त्यांची सांसदीय इतिहासात नोंद आहे. (क्रांतिसिंहांनी स्वातंत्र्यलढा, संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, शेतमजूर, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर केलेले संघर्ष हा स्वतंत्र विषय आहे.)

1967 च्या निवडणुकीत नानासाहेबांना 1 लाख 25 हजार 216 मते मिळाली. त्यांच्या विरोधात उभे असणारे काँग्रेसचे उमेदवार द्वारकादास मंत्री यांना 1 लाख 11 हजार 119 मते पडली. जनसंघाचे एन. के. मानधने यांना 25 हजार मतांवर समाधान मानावे लागले.

बीडकडे जाण्यासाठी पैसे नव्हते

1957 च्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना संयुक्‍त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे ते नाशिकच्या कारागृहात होते. नानांनी द. सातार्‍यातून निवडणूक लढवावी, असे भाकपचे म्हणणे होते. परंतु आपल्याकडे डिपॉझिट भरण्यासाठीही पैसे नाहीत, असे नानांनी कळविले. यासंदर्भातील पत्रात ते म्हणतात, मी द. सातार्‍यातून उभे रहावे असे एकंदरीत मंडळींचे मत दिसते. निवडणुकांमध्ये खर्चाचा प्रश्‍न हा लोकप्रियतेपेक्षाही महत्वाचा असतो. त्यामुळे निवडणुकीचा खर्च मी करू शकत नाही. माझी आर्थिक स्थिती 1930 पासून आपण जाणताच. संन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून सुरुवात, तशी डिपॉझिटपासून सुरुवात करावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुका संपूनही जातील, त्यामुळे निवडणुकीस उभे राहू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. (संदर्भ : क्रांतिसिंह नाना पाटील : एक अखंड क्रांतिकारक. साहित्य व संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित डॉ. भारत पाटणकर यांची पुस्तिका.). परंतु पक्षाने त्यांना उभे केले व जनतेच्या प्रेमाच्या बळावर निवडून गेले.

1967 ला त्यांनी बीड येथून उभे राहण्याचा आदेश मिळाला. तेव्हा त्यांच्याकडे बीड येथे जाण्यासाठी पैसे नव्हते. सातार्‍याचे कॉ. नारायण माने यांनी त्यांचे तिकिट काढले. ते सुद्धा नानांसोबत बीड येथे गेले. बीडला गेल्यावर क्रांतिसिंहांनी पैशाची अडचण सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करून डिपॉझिट रक्‍कम भरली व त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. या जिल्ह्यात असणारा कम्युनिस्टांचा प्रभाव, क्रांतिसिंहाचे वलय यामुळे ते निवडून आले आणि दुसर्‍या जिल्ह्यातील क्रांतिकारी नेत्याला बीडकरांनी लोकसभेत पाठविले.

पाटोद्यात ठोकला मुक्‍काम

खासदार झाल्यानंतर नानासाहेब पाटील यांनी पहिल्याच भाषणात पुढील पाच वर्ष आपण बीडमधून हालणार नाही, असा शब्द दिला. पाटोदा येथील ग्रामपंचायतीत आपला मुक्‍काम ठोकला आणि तेथूनच ते जनतेचे प्रश्‍न सोडवू लागले. पाटोद्यातील त्यांचे सहकारी भोजनाची व्यवस्था करीत. एक पत्र्याची पेटी, त्यात आईचा फोटो, दोन अंगरखे, दोन धोतर आणि पांघरायला एक घोंगडी हेच त्यांचे साहित्य होते. क्रांतिसिंहांचे पाटोदा येथील सहकारी सय्यद इक्बाल (पेंटर) संभाजीनगरात एका संमेलनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी नानांच्या काही आठवणी सांगितल्या. त्यांची पहिली सभा बीडच्या किल्‍ला मैदानावर झाली. या सभेत त्यांनी शेतकरी, दुष्काळाचे प्रश्‍न आपल्या खास रांगड्या शैलीत मांडले. त्यामुळे लोक प्रभावित झाले. नाना खासदार झाले तर सातार्‍यात परत जातील असा प्रचार काँग्रेसने केला होता. त्याकडे मतदारांनी फारसे लक्ष दिले नाही. नानांचे जेवण अगदी साधे होते. भाकरीबरोबर भाजी किंवा चटणी. ग्रामपंचायतीजवळ थंड पाण्याने स्नान करीत असत. अंबाजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि परळी- बीड- नगर मार्गाची सर्वप्रथ मागणी त्यांनीच केली होती. संसद अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते बसने संभाजीनगरला जात, तेथून मनमाडमार्गे दिल्‍लीला रेल्वेने जात असत.

माडगूळकरांची लिहिलेली आठवण

पत्रीसरकार असताना ग. दि. माडगूळकरांनी नानासाहेबांवर पोवाडा लिहिला होता. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर एका लेखात ते लिहितात, चार पाच वर्षापूर्वी त्यांची माझी गाठ एसटी बसमध्ये पडली. मी माझ्या गावाकडे निघालो होतो, ते आपल्या लेकीकडे. वयाच्या 71/72 वर्षापर्यंत ते एसटीने प्रवास करीत असा त्याचा अर्थ होतो. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली, तेव्हा नाना जिवंत होते. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढाही पुकारला. 21 सप्टेंबर,1976 रोजी मोराळे (ता. तासगाव) येथे त्यांनी प्रदीर्घ भाषण दिले. हे त्यांचे शेवटचे भाषण ठरले. भाकपने आणीबाणीला पाठिंबा दिला तरी नानांचा त्यास विरोध होता. दुर्देवाने, त्याच काळात पायाला जखम झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले व काहीशा मर्यादा आल्या होत्या. 6 डिसेंबर, 1976 रोजी त्यांनी अखेरचा श्‍वाास घेतला.

 

Back to top button